दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढविले, औषधांची विक्रीही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:13+5:302021-06-22T04:12:13+5:30
कोविडमुळे काळजीपेक्षा भीती अधिक : लॉकडाऊनचाही मनस्थितीवर परिणाम लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविडच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्णसंख्या व ...

दुसऱ्या लाटेने डिप्रेशन वाढविले, औषधांची विक्रीही वाढली
कोविडमुळे काळजीपेक्षा भीती अधिक : लॉकडाऊनचाही मनस्थितीवर परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या दुसऱ्या लाटेत वाढलेली रुग्णसंख्या व वाढलेले मृत्यू यामुळे काळजीपेक्षा भीतीचे प्रमाण वाढून यात नैराश्यात व चिंतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत हे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात, यातून एखादी व्यक्ती थेट आत्महत्या करण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत संसर्गाचे व मृत्यूचे प्रमाणही अधिक राहिले. त्यामुळे सर्वत्र एक भीतीचे वातावरण पसरले होते. असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे नैराश्यात वाढ झाली आहे. या मागे एकटेपणा, लोकांच्या भेटी न होणे याबाबीही कारणीभूत आहेत, असेही तज्ज्ञ सांगतात. गेल्या वर्षी कोरोनाचे ६० हजारांच्या आसपास रुग्ण होते, मात्र, या चार महिन्यात ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुपटीपेक्षा अधिक रुग्ण या दुसऱ्या लाटेत वाढले आहेत. शिवाय कमी वयाचे मृत्यूही पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अधिक झाले आहेत.
डिप्रेशन का वाढले?
आजूबाजूचे वातावरण हे असुरक्षित असल्याची भावना बळावल्याने, उद्या काय होणार याविषयी कसलीही कल्पना, माहिती नसणे, रोजगार जाणे, आर्थिक घडी विस्कटणे, कुणी जवळची व्यक्ती गमवावी लागणे, वारंवार केवळ कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबतच आणि मृत्यूबाबतच चर्चा होणे. संवाद, भेटी कमी होणे, या कारणांमुळे शिवाय दुसरी लाट अधिक भयंकर आहे, हाच एक संदेश वारंवार ऐकणे या सर्व बाबींमुळे या काळात नैराश्य आणि चिंतेचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.
हे टाळण्यासाठी काय कराल?
स्वत:ला कुठल्यातरी छंदात गुंतवून ठेवा, नियमित जे सांगितले आहे ते नियम पाळा, जास्तीत जास्त सकारात्मक रहा, व्यायाम करा, योग करा, नैराश्याचे वातावरण असले तरी ते दूर होईल, हा विचार मनात ठेवा. काही त्रास जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. कोरोनाबाबत केवळ माहिती ठेवा, काळजी करा, भीती नको.
कोट
पहिल्या लाटेतही नैराश्य होते, पण दुसऱ्या लाटेत हे प्रमाण अधिक वाढले आहे. या काळात चिंतेचे प्रमाणही वाढले आहे. अनेक वेळा लोक आत्महत्येचा विचारापर्यंत जात आहेत. याला असुरक्षिततेचे वातावरण, रोजगार गमावणे, कोरोना काळात कुणीतरी जवळचा व्यक्ती गमावणे अशी विविध कारणे आहेत. अती काळजीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे काळजी हवी मात्र, भीती नको यानुसार सुवर्णमध्य साधून व्यायाम, योग करून आपण या नैराश्यातून बाहेर पडू शकतो.
- डॉ. प्रदीप जोशी, मानसोपचारतज्ज्ञ
औषधांची विक्रीही वाढली
दुसऱ्या लाटेत डिप्रेशनचे प्रमाण वाढल्यानंतर यासाठी लागणाऱ्या गोळ्या डॉक्टरांकडून प्रिस्क्राईब केल्या जात असून यामुळे यांचीही विक्रीही वाढली आहे. शक्यतोवर डिप्रेशन संबंधित गोळ्या या डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिल्या जात नाहीत, असे औषध विक्रेत्यांनी सांगितले. अनेक लोक शासकीय यंत्रणेतही उपचार घेत आहे. शिवाय छोट्या मोठ्या आजारांसाठी अनेक लोक तर बाहेरही पडत नाहीय, असेही सांगण्यात येत आहे.