दुसऱ्या लाटेतही १७ टक्के मृत्यू खासगी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:49+5:302021-06-21T04:12:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : उपचाराचे पर्याय खुले व्हावेत म्हणून खासगी रुग्णालयांना काही निकषांच्या आधारावर कोविड उपचारांना मान्यता देण्यात ...

दुसऱ्या लाटेतही १७ टक्के मृत्यू खासगी रुग्णालयात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उपचाराचे पर्याय खुले व्हावेत म्हणून खासगी रुग्णालयांना काही निकषांच्या आधारावर कोविड उपचारांना मान्यता देण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांच्या मृत्यूचा विचार केला असता जिल्ह्यातील एकूण १७ टक्के कोरेानाचे मृत्यू हे खासगी रुग्णालयात नोंदविण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये एकत्रित २०७ मृत्यू झाले आहेत. मात्र, गेल्या १९ दिवसांचे चित्र बघितले असता ३३ पैकी केवळ ४ मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले असून २९ मृत्यूची नोंद शासकीय रुग्णालयात करण्यात आली आहे.
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात गेल्या १९ दिवसात केवळ २ मृत्यू झाले आहेत. या ठिकाणी एकूण ६२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णालयाचा काही भाग शासकीय पातळीवर अधिग्रहीत करण्यात आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणच्या मृत्यूची संख्या घटली आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे ५० टक्क्यांवर कोविड रुग्णालये बंद झाले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामानाने या १९ दिवसात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वाधिक २३ मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांबरोबरच मृत्यूचे प्रमाण हे सर्वत्र कमी होत असल्याचे यावरून समोर येत आहे.
पहिली लाट
मृत्यू १३६७
शासकीय १११४
खासगी २५३
दुसरी लाट
मृत्यू १२०१
शासकीय ९९४
खासगी २०७
जून महिन्यातील स्थिती
३३ पैकी २९ मृत्यू शासकीय रुग्णालय
०४ मृत्यू हे खासगी रुग्णालयात झाले आहेत.
१ जून रोजी
जीएमसी १००५
डॉ. उल्हास पाटील ६२४
पूर्णशासकीय यंत्रणा २०७९
खासगी रुग्णालय : ४५६
१९ जून रोजी
जीएमसी १०२८
डॉ. उल्हास पाटील ६२६
पूर्ण शासकीय यंत्रणा २१०८
खासगी रुग्णालय ४६०
कमी वयोगटाचे कमी मृत्यू
एकूण ३३ मृत्यूपैकी या महिन्यात ५० पेक्षा अधिक वय असलेल्या २७ रुग्णांचा समावेश आहे. तर सहा रुग्णांचे वय हे ५० वर्षापेक्षा कमी होते. यात एका ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
शहराला मोठा दिलासा
शहरात मध्यंतरी २४ तासात ७ ते ८ मृत्यूची नोंद केली जात होती. मात्र, गेल्या १९ दिवसांपासून शहरात तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण अगदी कमी झाल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय रुग्णसंख्येच्या बाबतीतही जळगाव शहरात आता अन्य तालुक्यांच्या तुलनेत समाधानकारक परिस्थिती आहे.