सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे कुलगुरुंच्या दालनासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:18 IST2021-07-28T04:18:06+5:302021-07-28T04:18:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारीसुद्धा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर ...

सलग दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे कुलगुरुंच्या दालनासमोर आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांच्या राजीनाम्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारीसुद्धा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना कृती समितीच्या वतीने प्रभारी कुलगुरुंच्या दालनासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, बुधवारी राजीनामा घेण्यात येईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, कुलसचिवांचा राजीरामा कुलगुरुंनी घेतला नाही तर कृतीस मितीकडून आंदोलन सुरूच ठेवले जाईल, अशी माहिती समितीचे सचिव भय्यासाहेब पाटील यांनी दिली.
प्रभारी कुलसचिव एस.आर. भादलीकर यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता शिक्षण संचालक कार्यालयात पाठविली, असा आरोप करीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना कृती गट समितीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. नंतर सोमवारी कृती समितीतर्फे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर द्वारसभा घेण्यात येऊन कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले होते.
दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी
राजीनाम्यासंदर्भात आश्वासन मिळाल्यानंतर सोमवारी आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत राजीनामा न घेतल्यामुळे दुपारी ३ वाजता कृती समितीचे अध्यक्ष शरद पाटील व सचिव भय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरुंच्या दालनासमोर कर्मचाऱ्यांनी सलग दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, सायंकाळी प्रभारी कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलवून बुधवारी व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे. त्याआधी किंवा त्यानंतर राजीनामा घेण्यात येईल, असे आश्वासन संघटनेला दिले, अशी माहिती संघटनेचे सचिव भय्यासाहेब पाटील यांनी दिली.
बुधवारी प्रभारी कुलसचिव यांचा राजीनामा प्रभारी कुलगुरु यांनी घेतला नाही तर संघटनेच्या वतीने आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे.
- भय्यासाहेब पाटील, सचिव, कृती समिती