शोध नीलेश भिल्लचा मात्र सापडला नोटांचा पाऊस पाडणारा भोंदू बाबा
By Admin | Updated: May 25, 2017 16:18 IST2017-05-25T16:18:23+5:302017-05-25T16:18:23+5:30
बोदवड पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात. बनाटव नोटांचे बंडल जप्त
शोध नीलेश भिल्लचा मात्र सापडला नोटांचा पाऊस पाडणारा भोंदू बाबा
ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.25 - राष्ट्रीय शौर्य पदक विजेता नीलेश भिल्ल काही दिवसांपासून भावासह बेपत्ता झाला आहे. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी आदेशबाबा नामक इसमाकडे चौकशी केली असता त्या ठिकाणी नोटांचा पाऊस पाडण्यासाठी विधी सुरु असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय शौर्य पदक विजेता नीलेश भिल्ल हा काही दिवसांपूर्वी भावासह बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलीस व वनविभागाने पथक नियुक्त केले आहे. एक पथक यापूर्वीच्या नरबळी प्रकरणातील संशयित आरोपी भिवसन सखाराम गोपाळ उर्फ आदेशबाबा याच्या हीग्नना ता. बोदवड येथील शेतात बुधवारी मध्यरात्री पोहोचले. मात्र या ठिकाणी पथकाला नीलेश व त्याचा भाऊ तर मिळाला नाही, मात्र नोटा पाडण्यासाठी आवश्यक पुजा सुरु होती. आदेशबाबा हा नोटा पाडण्यासाठी पूजा मांडून बसलेला असताना पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी रोकड रकमेसह बनावट नोटांचे बंडल जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी शिरपूर,जि.धुळे येथील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.