लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:49+5:302021-05-05T04:26:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बळीराम पेठ भागातील अनेक दुकानदारांनी मंगळवारी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवला होता. मनपा ...

लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बळीराम पेठ भागातील अनेक दुकानदारांनी मंगळवारी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवला होता. मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने या भागात जाऊन तब्बल ११ दुकाने सील केली आहेत. तसेच प्रत्येक दुकानदाराला पाच हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे.
शहरात कोरोना रुग्णांची संख्याही एकीकडे वाढत आहे तर दुसरीकडे प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी देखील नागरिक व व्यावसायिकांकडून होताना दिसून येत नाही. बाजारात दररोज गर्दी होत असून, प्रशासनाने आखून दिलेल्या नियमानुसार सकाळी अकरा वाजेनंतर देखील अनेक व्यावसायिक आपली दुकाने लपून छपून सुरूच ठेवत आहेत. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी मुख्य बाजारपेठ परिसरात पाहणी केली असता, अनेक दुकानमालक शटर लावून लपून छपून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. अनेक दुकानांमध्ये ग्राहकदेखील आढळून आले. त्यानंतर मनपा उपायुक्तांनी ११ दुकाने सील केली आहेत. गेल्या आठवडाभरात मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ४० हून अधिक दुकाने सील केली असून, दोन लाखांहून अधिक दंड देखील वसूल केला आहे.
या दुकानांवर करण्यात आली कारवाई
बळीराम पेठ भागातील बजाज ट्रेडर्स, जय वैष्णवी कलेक्शन, श्री बालाजी सन्स, अरिहंत कटलरी सेंटर, मेमसाब जनरल, शिव होजिअरी, नंदुरबारकर सराफ, बोहरा कॉम्प्लेक्समधील ब्रँडेड जीन्स व वाहेगुरू इलेक्ट्रिकल ही दुकाने देखील सील करण्यात आली आहेत.