कोरोनामुक्त गावांमधील शाळांच्या घंटा आज वाजणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:13 IST2021-07-15T04:13:16+5:302021-07-15T04:13:16+5:30
चाळीसगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची टाळेबंदी हटणार असून घंटा वाजणार आहे. कोरोनामुक्त ...

कोरोनामुक्त गावांमधील शाळांच्या घंटा आज वाजणार !
चाळीसगाव : कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांची टाळेबंदी हटणार असून घंटा वाजणार आहे. कोरोनामुक्त गावांमधील शाळा सरपंचांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता दिल्यानंतरच उघडण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शाळा उघडण्याचा मार्ग काहीअंशी मोकळा झाला आहे. तथापि, शहरी भागातील शाळांची टाळेबंदी मात्र अजूनही कायम आहे.
जिल्हाभरात ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या १ लाख ६८ हजार ६७० विद्यार्थ्यांना शाळांची घंटा वाजण्याचे औत्सुक्य आहे.
गेल्या १६ महिन्यांपासून सार्वजनिक टाळेबंदीनंतर शाळांनाही कुलपे लागली होती. जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्षदेखील ऑनलाईनच सुरू झाले. गेल्या वर्षात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय शहरी व ग्रामीण भागात कुचकामी ठरल्याची शेकडो उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेतला गेला. १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षा रद्द झाल्या. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमधीलच इयत्ता आठवी ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठी उत्सुकता आहे. ग्रामपंचायत स्तरावर ठराव झाल्यानंतरच शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
चौकट
तिसऱ्यांदा शाळांच्या घंटा वाजविण्याचा प्रयत्न
टाळेबंदीत पहिल्यांदा २७ नोव्हेंबर २०२० रोजी नववी ते १२ वीपर्यंतच्या शाळा उघडण्यात आल्या. यानंतर २७ जानेवारी २०२१ रोजी पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले गेले.
१. १५ एप्रिल २०२१ पासून पुन्हा लॉकडाऊन लागल्यानंतर या शाळाही बंद करण्यात आल्या.
२. कोरोना महामारीत गत १६ महिन्यांच्या काळात तिसऱ्यांदा शाळा सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे.
होतील आजपासून शाळा
१. ग्रामीण भागातील ज्या गावांत शाळा उघडली जाईल, तिथे शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिन्याआधी कोरोना रुग्ण आढळलेला असावा. गाव कोरोनामुक्त असेल, तरच शाळेची घंटा वाजेल.
२ अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे आवश्यक आहे.
३ शाळा परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी पालकांना प्रवेश दिला जाणार नाही.
४. विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून उपचार सुरू करावेत. परिसर निर्जंतुकीकरण करावा.
५. शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू कराव्यात. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याची बसण्याची व्यवस्था असावी.
६. वर्गात १ ते २० विद्यार्थ्यांनाच बोलवावे. शाळा सकाळ व दुपार सत्र यापैकी सोयीनुसार भरवावी. दोन बाकांमध्ये सहा फुटाचे अंतर असावे. नियमित हात धुण्यासह मास्क वापरण्याच्या सूचना द्याव्यात.
महत्त्वाची चौकट
चाळीसगावला सुरू होणार ५ शाळा
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण ८६ पैकी ५ शाळा सुरू करण्याचे ठराव झाले आहेत. ग्रामपंचायत स्तरावर गठित केलेल्या समितीने सर्व आढावा घेऊन पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याचे ठराव केले आहेत. गुरुवारपासून या ५ शाळांच्या घंटा वाजणार असून कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना दिल्या आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
चौकट
जिल्हाभरात ग्रामीण भागात १ लाख ६८ हजार ६७० विद्यार्थी
तालुकानिहाय शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्या अशी :
तालुका शाळा विद्यार्थी शिक्षक
अमळनेर ६. ९५६९ ६६९
भडगाव ३५ १०४३७ ५३५
भुसावळ ३२ ९८४८ ५०९
बोदवड १६ ५६३१ २४७
चाळीसगाव ९१ १८२३८ १०९६
चोपडा ४. १२७७८ ६३१
धरणगाव ४. ६६१८ ४३९
एरंडोल ३१ ६०११ ३६३
जळगाव ५. १३२०७ ७५५
जामनेर ५. १५८५१ ७३९
मुक्ताईनगर ३१ १०७८८ ४७३
पाचोरा ५. १५३८९ ८१३
पारोळा ४. ९२०१ ४६७
रावेर ५. १३२८२ ६४४
यावल ५. ११८१२ ६६५
७०८ १६८६७० ९०४५