पाऊस झाल्याचे समाधान, पण दडीने बळीराजाची विस्कटली आर्थिक घडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:05+5:302021-08-20T04:21:05+5:30
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडासह परिसरात गेले दोन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे. पण गेल्या अडीच महिन्याच्या ...

पाऊस झाल्याचे समाधान, पण दडीने बळीराजाची विस्कटली आर्थिक घडी
पातोंडा, ता. अमळनेर : पातोंडासह परिसरात गेले दोन दिवस पाऊस झाल्याने बळीराजाचे समाधान झाले खरे. पण गेल्या अडीच महिन्याच्या ओढीने (दडीने) संपूर्ण खरिपाचा हंगाम वाया गेल्याने बळीराजाची पूर्णतः आर्थिक घडी विस्कटली. जून, जुलै व अर्धा ऑगस्टपर्यंत पावसाने ओढ देऊन जवळजवळ अडीच महिना दडी मारली होती. यामुळे शेतीवरच जीवनमान अवलंबून असलेल्या बळीराजाची पूर्णतः शेती उत्पादनाची व आर्थिक प्रपंचाची घडी विस्कटली आहे.
पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून काहींनी पिकांचा पाटा पाडला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणे पेरणी करून आर्थिक झटका बसला.
जूनमध्ये एकदा, जुलैपण एकच असा फक्त साठ-सत्तर मि.मी. इतकाच पाऊस झाला. अर्धा आगस्ट महिनापण कोरडा गेला. भरपावसाचा ऋतू हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला. पिके अजून जमिनीच्या कुशीतच आहेत, पावसाअभावी वाढ खुंटल्याने, वरून उन्हाचा तडाखा यामुळे पिके जळू लागली. आता पाऊस पडला तरी फक्त समाधान होईल, पण खरिपाचा हंगाम वाया जाणार हे संकट कायम राहील.
पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहिवद,
सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसर या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमाधारकांना संपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे दुष्काळी गावातील सरपंच, उपसपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडला मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
गेली साठ-सत्तर वर्षांत पावसाळ्यात पाऊसच झाला नाही, हा पहिलाच प्रसंग पहावयास मिळतो आहे. कितीही भयावह परिस्थिती झाली. तरीही चाळीस-पन्नास टक्के हंगाम यायचा. चालूवर्षी पाऊसच झाला नाही. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. तीन महिन्यांचा पावसाळा संपत आला. पावसाळ्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, असा बळीरावरील कटू प्रसंग आमच्या साठ-सत्तर वय झाले तरी पाहिला नाही, अशा निराशाजनक प्रतिक्रिया बहुसंख्य वयोवृद्ध शेतकऱ्यांनी कथन केल्या.