सार्वे धरण ओसंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST2021-09-05T04:20:12+5:302021-09-05T04:20:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कजगाव (ता. भडगाव) : येथून जवळच असलेल्या सार्वे (ता. पाचोरा) येथील सार्वे खाजोळे लघु पाटबंधारे ...

The Sarve dam overflowed | सार्वे धरण ओसंडले

सार्वे धरण ओसंडले

लोकमत न्यूज नेटवर्क

कजगाव (ता. भडगाव) : येथून जवळच असलेल्या सार्वे (ता. पाचोरा) येथील सार्वे खाजोळे लघु पाटबंधारे प्रकल्प दि.३१ रोजी ओसांडले. धरण शंभर टक्के भरल्याने परिसरातील शेतकरी सुखावला असून, बागायत पीक बहरणार आहेत.

सार्वे, खाजोळे लघुपाटबंधारे प्रकल्प हा सार्वे गावाजवळ बोकड नदीवर उभारण्यात आला आहे. त्याचे काम २७ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १९९४ मध्ये सुरू झाले होते. हे काम तब्बल तीन वर्षांपर्यंत सुरू होते. तीन वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले. सन १९९६ मध्ये ते काम पूर्ण झाले होते.

आशिया खंडातील पहिला प्रकल्प होता

सार्वे येथे सुरू झालेल्या या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प होता पायऱ्यांचा सांडवा असलेल्या या प्रकल्पाचे वैशिष्ट्य होते व आहे. असे हे धरण आतापर्यंत अनेकवेळा ओसांडले आहे. यावर्षीदेखील अर्ध्या पावसाळ्यानंतर ते ओसांडल्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावला आहे. या धरणातून गेलेल्या पाटचारीमुळे सार्वे, पिंप्री, खाजोळे या गावांना याचा फायदा होतो.

धरण भरल्यामुळे बागायत वाचणार

यावर्षी परिसरात पाऊस जेमतेमच पडला. मात्र, जेमतेम पडलेल्या पावसाने पीक मात्र जोमात उभी होती. मध्यंतरी पीक ऊन पकडत कोमजू लागली होती. मात्र, ‘ब्रेक के बाद’ पडलेल्या पावसामुळे पीक परिस्थिती बरी होती. दरम्यान, दि. ३१ रोजी येथील धरण पूर्ण भरल्यामुळे ते ओसांडले. ते ओसांडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण तयार झाले आहे. धरण भरल्यामुळे धरण क्षेत्रातील बागायत पीक चांगलीच बहरतील. या भागातील ऊस व केळी याचा मोठा फायदा निश्चितच होणार आहे.

अंदाजे आठशे ते नऊशे एकर क्षेत्र ओलिताखाली येणार

सार्वे धरण क्षेत्रात अंदाजे आठशे ते नऊशे एकर क्षेत्र हे ओलिताखाली येत असल्याने धरण भरल्यानंतर याचा मोठा फायदा ओलिताखाली आलेल्या बागायत क्षेत्राला होतो.

सार्वे धरण भरल्यामुळे याचा थेट फायदा बागायत शेतीसाठी होतो. यावर्षी धरण भरेल, असे वाटत नव्हते. कारण ऑगस्ट महिना संपला होता. यामुळे धरण भरण्याची आशा संपली होती. मात्र, एकाच रात्रीत धरण भरले नी हातची वाया जाणारी बागायत वाचली. यामुळे बागायतदार शेतकऱ्यांत आनंदी वातावरण आहे.

- भास्कर परशराम पाटील, शेतकरी सार्वे.

शेवटच्या टप्प्यात आलेल्या पावसाळ्यामुळे धरण भरण्याची आशा साऱ्यांनीच सोडली होती. मात्र, एकाच दिवसात धरण पूर्ण भरत ओसांडल्याने सर्वत्र आनंदी वातावरण तयार झाले. हातची जाणारी बागायत वाचणार असून, बागायत फुलणार आहे. या शेती उत्पन्नात भर पडेल. पाणी प्रश्नदेखील मिटेल.

- धर्मेंद्र दत्तात्रय बोरसे, शेतकरी सार्वे

040921\04jal_11_04092021_12.jpg

धरणातून ओसांडणारे पाणी.

Web Title: The Sarve dam overflowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.