साळवा येथे पावसामुळे घराचे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:53+5:302021-08-21T04:21:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड, ता. धरणगाव : गेल्या दोन दिवसांपासून या भागात पाऊस होत असून, पावसामुळे घराच्या छतावरील माती ...

साळवा येथे पावसामुळे घराचे छत कोसळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड, ता. धरणगाव : गेल्या दोन दिवसांपासून या भागात पाऊस होत असून, पावसामुळे घराच्या छतावरील माती भिजल्याने छत (मातीचे धाबे) कोसळल्याची घटना साळवा येथे २० रोजी पहाटे चार ते साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यात वृद्ध दांपत्य बालंबाल बचावले.
याबाबतची माहिती अशी की, साळवा येथील सुभाष वैशम अत्तरदे यांचे मातीचे छत असलेले घर गावातीलच चंद्रकात चिंतामण इंगळे यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले असून, त्या घरात ते पत्नीसह रहात होते. पावसामुळे घराच्या छतावरील माती पूर्णतः भिजून जड झाल्याने छत खाली कोसळले. यावेळी वृद्ध दांपत्य घरात झोपलेले असताना त्यांना काहीतरी चाहुल लागली आणि ते त्वरित घराबाहेर आले आणि बालंबाल बचावले. मात्र घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने आजच त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सरपंच इशा बोरोले, उपसरपंच सतीश पवार, ग्रामपंचायत सदस्य यतीन बऱ्हाटे, मनोज अत्तरदे यांनी भेट दिली.
चंद्रकांत इंगळे यांची आर्थिक स्थिती अतिशय गरिबीची असल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.