जळगावात दोन दिवसात 2 हजार वाहनांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 18:43 IST2017-04-01T18:43:35+5:302017-04-01T18:43:35+5:30
खरेदीदारांनी खिशात पैसे घेऊन रणरणत्या उन्हात गाडी मिळविण्यासाठी धडपड केली.

जळगावात दोन दिवसात 2 हजार वाहनांची विक्री
जळगाव : सवलतीच्या दरात मिळणा:या बीएस-3 इंजिन असलेल्या वाहनांची खरेदी करण्यासाठी दुस:या दिवशी, शुक्रवारी गर्दीमध्ये आणखी भर पडून खरेदीदारांनी खिशात पैसे घेऊन रणरणत्या उन्हात गाडी मिळविण्यासाठी धडपड केली. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जास्त गाडय़ांची विक्री होऊन दोनच दिवसात तब्बल दोन हजारावर दुचाकींची विक्री झाली.
दरम्यान, बीएस-3 इंजिन असलेल्या अनेक कंपन्यांचे वाहने दुपारीच संपले. काही ठिकाणी गर्दीमुळे दुकानांचे शटर बंद करण्यात आले होते तर काही ठिकाणी रात्रीर्पयत गर्दी कायम होती.
भारत स्टेज-3 (बीएस-3) इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्री व नोंदणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालण्याचा निर्णय दिला. त्यामुळे 1 एप्रिलपासून बीएस-4 इंजिन असलेलीच वाहने विक्री करता येणार असल्याने वाहन कंपन्यांनी सध्या उपलब्ध असलेली बीएस -3 वाहनांची विक्री करण्यासाठी 30 मार्चपासून त्यांच्यावर मोठी सवलत जाहीर केली. कंपन्यांकडून सवलत जाहीर होताच पहिल्या दिवसापासूनच ही वाहने खरेदीसाठी झुंबड उडाली व दुस:या दिवशीही ती कायम होती.
गुरुवारी रात्रीर्पयत गर्दी असताना शुक्रवारी सकाळपासूनच पुन्हा दुचाकींच्या दालनासमोर गर्दी होऊ लागली होती. जो तो आपल्याला प्रथम वाहन मिळावे यासाठी धडपड करीत होता.
पैसे घेऊन उन्हात प्रतीक्षा
शहरातील दालनांमध्ये गर्दी वाढतच गेल्याने प्रत्येकाला प्रतीक्षा करावी लागत होती. येथे येणारे सर्वच जण सोबत हजारो रुपये घेऊन रणरणत्या उन्हातही गाडी मिळविण्यासाठी रेटारेटी करीत होते. विशेष म्हणजे आवडीची गाडी मिळावी ही सर्वांचीच अपेक्षा होती व त्यासाठी रांगाही लागल्या होत्या. मात्र मनासारख्या दुचाकी शिल्लक नव्हत्या तरी सवलतीचा लाभ घ्यायचा म्हणून एका दालनापासून दुस:या दालनाकडे खरेदीदार धाव घेत होते.
नोंदणीसाठी धडपड
वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी करण्यासाठीही वाहनधारकांची धडपड सुरु होती. त्यासाठी शोरुम्स चालकांकडे आग्रह केला जात होता.
कोटय़वधीची उलाढाल
दोन दिवसात जळगाव शहर व जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वाहनांची विक्री झाली आहे. त्यातून कोटय़वधीची उलाढाल झाली आहे. काही ग्राहक वाहने खरेदीसाठी ग्रामीण भागातून आले होते. सोबत आवश्यकती कागदपत्रेही त्यांनी आणली होती. शहरातील बहुसंख्य शोरुम्सवर सकाळी आठ वाजेपासून प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अवघ्या काही तासात वाहने संपली.
वाहनांची नोंदणी ऑनलाईन झाल्याने विक्रेते ही नोंदणी करतात. त्यामुळे कार्यालयात गर्दी नव्हती की वाढीव कक्षहीनव्हते. विक्रेत्यांनी नोंदणी केलेला डाटा आमच्या कार्यालयात येतो. त्यानंतरच वाहनांच्या नोंदणीची संख्या समजते.
- विकास ब:हाटे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.