साकेगाव जि. प. शाळेतून चार संगणकांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:20 IST2021-08-23T04:20:42+5:302021-08-23T04:20:42+5:30
२४ वर्ग खोली असलेल्या या शाळेमध्ये चार महिला शिक्षका कार्यरत असून विद्यार्थी संख्या एकूण ८९ इतकी आहे. या शाळेमध्ये ...

साकेगाव जि. प. शाळेतून चार संगणकांची चोरी
२४ वर्ग खोली असलेल्या या शाळेमध्ये चार महिला शिक्षका कार्यरत असून विद्यार्थी संख्या एकूण ८९ इतकी आहे.
या शाळेमध्ये "आओ जाओ घर तुम्हारा" अशी गत झाली आहे. सातत्याने येथे चोरीच्या घटना घडत असतात. कधी वर्गखोल्यांचे लोखंडी खिडक्यांचे ग्रिल गायब होतात तर कधी कुलूप तुटलेले असतात तर कधी दरवाजाचे लॉक तोडून कागदपत्रांची अफरातफर केलेली असते. ही नित्याचीच बाब या शाळेत झाली आहे. नुकतेच या शाळेमध्ये बंद खोलीत भुरट्या चोरांनी मागच्या बाजूने येऊन खिडकीच्या लोखंडी आसाऱ्या वाकवून आत प्रवेश केला व खोलीत ठेवलेले चारही संगणक गायब केले.
महिला शिक्षकांना टवाळखोर जुमानत नाहीत
या शाळेमध्ये चारही शिक्षक या महिला आहेत. टवाळखोर या ठिकाणी दिवसभर मुक्तसंचार करीत असतात. एखाद वेळेस त्यांना काही म्हटलं तर चक्क वर्गखोल्यांमध्ये दगडही भिरकवतात, अशी आपबीती शिक्षिकांनी कथन केली. महिला असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. शाळेतून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी वेगळेच चित्र या परिसरामध्ये दिसून येते, असे कथन या शाळेतील शिक्षिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.
जि. प. सदस्यांची भेट
जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी शाळेची झालेली दुर्दशा व झालेल्या चोरीच्या घटनेबाबत शाळेत येऊन पाहणी केली. तसेच शाळेच्या झालेली दयनीय अवस्थेचे लवकरच रूप बदलेल, असे आश्वासत देत परिसराच्या साफसफाईसह मैदानी खेळ या आवारात कशा पद्धतीने घेता येईल याबाबत सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. तसेच या ठिकाणी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जी काही मदत व सहकार्य लागत लागेल ते करण्याचे आश्वासन दिले.