अकरा वर्षात ग्रामीण बिगर शेती ते मल्टीस्टेटपर्यंत मारली मजल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:29 AM2020-12-03T04:29:31+5:302020-12-03T04:29:31+5:30

जळगाव : तब्बल १६०० कोटी रुपयांच्या बेनामी ठेवी, कवडीमोल दरात मालमत्तेची विक्री व घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी ...

From rural non-agricultural to multistate in eleven years | अकरा वर्षात ग्रामीण बिगर शेती ते मल्टीस्टेटपर्यंत मारली मजल

अकरा वर्षात ग्रामीण बिगर शेती ते मल्टीस्टेटपर्यंत मारली मजल

Next

जळगाव : तब्बल १६०० कोटी रुपयांच्या बेनामी ठेवी, कवडीमोल दरात मालमत्तेची विक्री व घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेची अर्थात बीएचआरने ग्रामीण बिगर शेतीपासून सुरुवात करुन ती जिल्हा, राज्य व नंतर देशपातळीवर मजल मारली. विश्वासावर गुंतवणूक करणाऱ्या ग्रामीण ते शहरापर्यंतच्या लोकांचा या संस्थेत विश्वासघात होत गेला. अपहार व घोटाळा पाहता संस्थापक व संचालकांपेक्षाही अवसायकच चोरावर मोर झाल्याचा प्रकार उघडकीस आला. थोडक्यात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा हा प्रकार आहे. पतसंस्थेच्या संचालकांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षक कायद्याने (एमपीआयडी) राज्यातील ५३ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थापक प्रमोद रायसोनीसह १४ संचालक पाच वर्षापासून कारागृहात आहेत. आता अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह अनेकांवर एमपीआयडी, फसवणूक व अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

असा झाला विस्तार

भाईचंद हिराचंद रायसोनी या संस्थेची सुरुवात खऱ्या अर्थाने तळेगाव, ता.जामनेर या खेडेगावातून झाली. ५ फेब्रुवारी १९९६ रोजी भाईचंद हिराचंद रासयोनी ग्रामीण बिगर शेती को-ऑप.क्रेडीट सोसायटी, तळेगाव, ता.जामनेर (आदेश क्र.जे.जी.ए./जे.एम.आर/आएसआर/सीआर १०७६/१९९५-९६) या नावाने सुरु झाली. त्यानंतर अपर आयुक्त, विशेष निबंधक सहकारी संस्था यांच्या २१ एप्रिल २००४ रोजी सोसायटीच्या कामकाजात बदल व विस्तार होऊन सोसायटी भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडीट सोसायटी नावाने नावारुपास आली. सुरुवातील ग्रामीण कार्यक्षेत्र असलेली या संस्थेचे कार्यक्षेत्र जिल्हा झाले. तिसऱ्या टप्प्यात भारत सरकारच्या सहकार खात्याच्या आदेशाने (क्र.एमएससीएच/सीआर/२५५/२००७) ३१ ऑगस्ट २००७ रोजी ही संस्था भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटी लि.महाराष्ट्र या नावाने नावारुपाला आली. यामुळे संसथेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर झाले होते.

संस्था केंद्राच्या कार्यक्षेत असल्याने राज्याचे हात बांधले

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि.जळगाव ही संस्था बहुराज्यीय (मल्टीस्टेट) सहकारी संस्था अधिनियम २००२ अन्वये नोंदणीकृत आहे. संस्थेचे निबंधक हे केंद्रीय निबंधक, सहकारी संस्था, भारत सरकार. नवी दिल्ली हे आहेत. बहुराज्यीय संस्था असल्याने ही संस्था राज्याच्या सहकार क्षेत्राच्या कार्यकक्षेत येत नाही, त्यामुळे कारवाईला राज्य सरकारला मर्यादा आहेत. घोटाळ्यामुळे ही संस्था २७ ऑक्टोबर २०१५ रोजी अवसायनात काढण्यात आली. तेव्हा अवसायक म्हणून जितेंद्र कंडारेची नियुक्ती करण्यात आली होती, ती आजतायगत कायम आहे. संचालकांच्या घोटाळ्यामुळे संस्था अवसायनात निघाल्यानंतर कंडारे हा त्यांच्याही वरचा घोटाळेबाज निघाला. सर्वच सूत्रे हाती आल्यानंतर त्यानेही मोठाच घोटाळा केला.

नऊ राज्यात विस्तार

बीएचआर या संस्थेचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, दिल्ली, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व छत्तीसगढ या नऊ राज्यात विस्तार असून त्याचे मुख्यालय जळगाव आहे. २०१५ च्या लेखापरिक्षण अहवालानुसार संस्थेचे ९० हजार ठेवीदार असून त्यांच्या ८७१ कोटी रुपयांच्या देणी बाकी आहे. त्याशिवाय २२ हजार कर्जदार असून त्यांच्याकडून ७२४ कोटी रुपये येणे बाकी असल्याचे नमूद आहे.

दृष्टीक्षेपात बीएचआर (२०१३-१५ च्या अहवालानुसार)

देशात एकूण शाखा : २४५

एकूण राज्ये : ०९

भागदारक : २५,०००

नामपात्र भागदारक : १५,०००

एकूण ठेवी : १६०० कोटी

Web Title: From rural non-agricultural to multistate in eleven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.