पाणीपट्टीवरून सत्ताधारी - विरोधक आमने सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:12 IST2021-07-23T04:12:22+5:302021-07-23T04:12:22+5:30
शहर विकास मंचनेच पाणीपट्टी वाढ थांबविली असल्याचा दावा सत्ताधारी गटाचे नेते जीवन चौधरी यांनी केला आहे तर विशिष्ट ...

पाणीपट्टीवरून सत्ताधारी - विरोधक आमने सामने
शहर विकास मंचनेच पाणीपट्टी वाढ थांबविली असल्याचा दावा सत्ताधारी गटाचे नेते जीवन चौधरी यांनी केला आहे तर विशिष्ट प्रभागातीलच विषय मंजूर करायचे आणि विकास झाला सांगायचे, या प्रकाराला शिवसेना कधीच समर्थन करणार नाही, असा थेट आरोप विरोधी गट नेते महेंद्र धनगर यांनी केला आहे. याप्रकरणी नगराध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, असे सांगत नगरसेविका संध्या महाजन यांनीही जाब विचारला आहे.
येथील न. पा.च्या सर्वसाधारण सभेत त्रुटीयुक्त विषय वेळीच लक्षात आला, असा खडा सवाल विचारणारी उपसूचना मांडली व सत्ताधाऱ्यांना ठराव मागे घ्यावा लागला, यावरून नक्कीच ही आमची समयसुचकता आहे. उशिरा सुचलेले शहाणपण नाही. नागरिकांच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या बाजूने शिवसेना पक्ष नेहमीच उभा आहे. त्यामुळे राजकारण करण्याचा प्रश्नच नाही. शहर विकास मंचचे गटनेते यांनी आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना विरोधक राजकारण करतात, हे नेहमीचेच ठेवणीतले उत्तर दिले. त्यांनी स्वतः आता तरी स्वविवेकाने निदान आमच्या सूचना व जाहीर पत्रक स्वतः नीट वाचावेत व त्यातील सर्व प्रश्नांची जनतेला उत्तरे द्यावेत, असा टोला पालिकेतील विरोधी गटनेते महेंद्र धनगर यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर करून सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
चोपडा शहर मंचची जर पाणीपट्टी दरवाढ न करण्याबाबत जर भूमिका होती, तर अध्यक्षांनी व सत्ताधाऱ्यांनी नगर परिषद सदस्य, विरोधी पक्ष, नागरिक यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता, कुठलीही बैठक न घेता, समिती स्थापन न करता तो विषय अजेंडा व सभापटलावर घेतलाच कसा ? प्रशासनाकडून कुणालाच अगदी चोपडा शहर विकास मंचालाही विश्वासात न घेता असा त्रुटीयुक्त व अन्यायकारक प्रस्ताव कसा काय मांडण्यात आला. याबाबत प्रस्ताव तयार करणाऱ्या तज्ज्ञ पाणी पुरवठा अभियंता व सादर करणारे मुख्याधिकारी यांनी उत्तर देणे अपेक्षित आहे. या ठरावात उत्पन्न व खर्च याची तुट काढतानाच चुकलेले, साधी गणना न करू शकणारे, मुळात तूट ही संकल्पनाच समजू न शकणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांकडे पाणीपट्टी वाढीसारखा गंभीर विषय देणे व असा त्रुटीयुक्त ठराव सभेपुढे येणे आश्चर्याची बाब आहे, असे मत शिवसेना गटनेते महेंद्र धनगर यांनी व्यक्त केले आहे.
नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी
याच पाणीपुरवठा अभियंता यांनी सन २०१९-२० मध्ये १२१ लक्ष अवास्तव खर्च कसा केला याबाबत अध्यक्षांनी त्यांना विचारणा करणे अपेक्षित आहे. ज्याबाबत आम्ही मागील वर्षीच दि.०९ सप्टेंबर २०२० च्या सभेत लेखी सूचनादेखील मांडली होती. तसेच सन २०१९-२० मधील वृक्षारोपण घोटाळा निकालात जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या निकालात १६२९ रोपे जागेवर नसणे गंभीर बाब आहे, असे नमूद आहे. सुमारे ५० ते ६० टक्के झाडे न लागता बिले काढलीच कशी? आणि आता सन २०२१ मध्ये १६२९ झाडे लावणे याचाच अर्थ तेव्हा ही झाडे न लागता बिले काढली होती. यावरून त्यांनी केलेला घोटाळा सिद्ध होतोच, याबाबत नगराध्यक्ष व चोपडा शहर विकास मंचाची भूमिका नेमकी काय आहे? हे स्पष्ट करावे, असे मत संध्या महाजन यांनी व्यक्त केले आहे.