भुसावळला सत्ताधारी सदस्यांमध्येच सभेपूर्वी खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:54 IST2018-10-31T01:52:07+5:302018-10-31T01:54:30+5:30
भुसावळ नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.

भुसावळला सत्ताधारी सदस्यांमध्येच सभेपूर्वी खडाजंगी
भुसावळ : नगर पालिकेच्या मंगळवारी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वीच सत्ताधारी गटातील नगरसेवक आणि नगरसेविका पती यांच्यात प्रभागात कामे करण्याच्या मुद्यावरून चांगलीच खडाजंगी झाली, तर या सभेवर विरोधी जनाधार पार्टीने बहिष्कार टाकला. सभेत अवघ्या २५ मिनिटात ३५ विषयांना मंजुरी देण्यात आली.
पाणी प्रश्नावर गंभीर चिंता
पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर विरोधी जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला असला तरी, सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, युवराज लोणारी व नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासनाने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांनी मांडलेल्या सूचनांमुळे ही सभा पंचवीस मिनिटे चालली . पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे होते तर व्यासपीठावर उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर उपस्थित होते. होते.
सभेच्या अजेंड्यावर एकूण ३५ विषय होते . यातील विषय क्रमांक २७,२८ व २९ या तीन विषयावरील चर्चेच्या वेळी नगरसेवक कोठारी यांनी तापी नदीवरील बंधारा कामासंदर्भात आमदार संजय सावकारे यांनी रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली आहे . उन्हाळ्यात पाणीटंचाई संदर्भात समस्या सोडवण्याची चर्चा केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी बोलून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली.
तसेच स्मशान भूमी व कब्रस्तानमध्ये स्वच्छतेसाठी रोजंदारीवर माणूस ठेवण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मांडली . त्यांच्या या सूचनेला नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी अनुमोदन दिले.
दरम्यान , शहरात दहा ते बारा दिवसाआड पाणी येत असल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात यावा, अशी सूचना नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी मांडली. महिला नगरसेविका असल्यामुळे महिलांच्या तक्रारी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . त्यामुळे हा प्रश्न ताबडतोब सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तर नगरसेवक लोणारी व प्रमोद नेमाडे यांनीही काही सूचना मांडल्या. मात्र सर्वच विषयांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगून सभा संपल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी जाहीर केले.
जनाधार पार्टीचा बहिष्कार पालिकेतील सत्ताधाऱ्यांची मनमानी व तत्कालीन मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्या हुकूमशाहीमुळे जनाधार पार्टीचे नगरसेवक व नगरसेविका अपात्र झाले असल्याचा आरोप करून आजच्या सर्वसाधारण सभेचा जाहिर निषेध करून या सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र उपगटनेते शेख जाकीर सरदार यांनी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना सभेपूर्वीच दिले होते. व त्यानंतर जनाधार पार्टीच्या नगरसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकून ते अनुपस्थित राहिले.
दरम्यान, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी पाण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव नसल्याचे सभेत सांगितले, मात्र या उत्तरावर मी समाधानी नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक निर्मल कोठारी यांनी दिली. पाण्याची गरज शहराला आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने रेल्वेच्या अधिकाºयांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत शहराला गरज आहे रेल्वेला नाही असा दावा लोकमतशी बोलताना त्यांनी केला.