तिसरी लाट रोखण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:40+5:302021-06-02T04:13:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याच्या शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आल्या आहेत. तिसरी लाट येईलच ...

तिसरी लाट रोखण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तिसऱ्या लाटेत मुलांना धोका अधिक असल्याच्या शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आल्या आहेत. तिसरी लाट येईलच किंवा काय याबाबत मत-मतांतरे असले तरी पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेतल्यास भीती न बाळगता सतर्क राहिल्यास ही तिसरी लाट रोखता येऊ शकते, मुलांना बाधित होण्यापासून आपण वाचवू शकतो, असा सल्ला शहरातील बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.
लहान मुलांच्या बाबतीत आगामी काळात थोडी अधिक सतर्कता बाळगावी लागणार असल्याचे काही डॉक्टर सांगतात. यात अतिकाळजी किंवा भीती न बाळगता योग्य ती दक्षता घेतली गेली पाहिजे. यात अगदी साध्या साध्या गोष्टी पाळून आपण आपल्या मुलांना सुरक्षित ठेवू शकणार आहोत. यात आहाराचीही महत्त्वाची भूमिका राहणार असून, यात घरचे ताजे जेवण हवे, यावर डॉक्टरांनी अधिक भर दिला आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होत असताना पालकांनीही त्यांच्या पातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे.
जीएमसीत शंभर बेड
आगामी तिसरी लाट व मुलांमधील अधिक धोका या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लहान मुलांसाठी शंभर बेडची व्यवस्था राहणार असून, त्यांच्यासाठीच्या व्हेंटिलेटरचेही नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यासह मोहाडी रुग्णालयात स्वतंत्र ५० बेडची व्यवस्था राहणार आहे.
बालकांची ही घ्या काळजी
- बालकांना संतुलित, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. उगाच व्हिटॅमिनच्या गोळ्या देऊ नये, बाहेरचे अन्न टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळावे, दोन वर्षांवरील मुले मास्क परिधान करू शकतात, त्यामुळे बाहेर कुठे असताना त्यांनी मास्क परिधान करावा. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुलांना कसलाही त्रास जाणवल्यास तातडीने त्यांची तपासणी करून योग्य ठिकाणीच उपचार घ्यावेत. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवणे गरेजेचे आहे.
कोट
लहान मुलांना संसर्ग होण्याचा अधिक धोका हा घरातील वरिष्ठांकडूनच आहे. अशा स्थितीत पालकांनी स्वत: सुरक्षित राहिल्यास बालकांना कोविड होण्याचा धोका कमी होईल. कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे पालकांनी टाळलेच पाहिजे, गर्दीचे कार्यक्रम टाळलेच पाहिजे. आहाराच्या बाबतीत नियमितचा संतुलित, पौष्टिक आहार घेतला तरी पुरेसा आहे. त्यात फळे अधिक घेऊ शकतात, अंडी घेऊ शकतात. पालकांची भूमिका यात महत्त्वाची राहणार आहे.
- डॉ. दीपक अटल, बालरोगतज्ज्ञ
कोट
लाट येईलच असे नाही; मात्र, त्यासाठी सतर्क राहणे गरजचे आहे. सर्वात आधी पालकांनी स्वत: सुरक्षित राहावे जेणेकरून मुले सुरक्षित राहतील. कोरोना कमी झालाय म्हणून हलगर्जीपणा केलेला चालणार नाही. मुलांना गर्दीत नेणे टाळायलाच हवे, आता जसे जगतोय, मास्क, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग हे पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय बालकांच्या उपचारांसाठीची एक स्वतंत्र यंत्रणेची मोठी व्यवस्थाही हवी, शासन त्या दृष्टीने प्रयत्न करतेय.
- डॉ. नंदिनी आठवले, बालरोगतज्ज्ञ
घरात कोणीही बाधित आढळल्यास त्यांच्या संपर्कात येणाऱ्या मुलांची लक्षणे असो किंवा नसो तपासणी करून घेणे अत्यावश्यक आहे. मुलांना ज्या बाबींचा त्रास होत असेल त्या टाळणे, म्हणजेच पावसात भिजणे असेल, बाहेरचे पदार्थ असतील, कोल्ड्रिंक्स, थंड पाणी या बाबी टाळणे, घरातील ताजा संतुलित आहार त्यांना देणे, त्यांचे लसीकरण करून घेणे, पुढील काळात कोविडसोबतच पोस्ट कोविडच्या विकारांचाही सामना आपल्याला करायचा आहे. त्यादृष्टीने बाळांना लक्षणे आढळल्यास तातडीने योग्य डॉक्टरांकडे दाखवून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरेल.
- बाळासाहेब सुरोसे, बालरोग विभागप्रमुख, जीएमसी.