खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:14 IST2021-06-04T04:14:21+5:302021-06-04T04:14:21+5:30
मुक्ताईनगर : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आंतरजिल्हा प्रवास बंदी करण्यात आली असून खासगी वाहनधारक लूट ...

खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट
मुक्ताईनगर : गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आंतरजिल्हा प्रवास बंदी करण्यात आली असून खासगी वाहनधारक लूट करत असल्याने किमान तालुक्याच्या आत तरी प्रवासी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगर तालुक्यातील प्रवाशांनी केली आहे.
मार्च महिन्यापासून लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तसेच डेपोमध्ये " जैसे थे"या स्थितीत बस उभ्या आहेत. राज्याच्या लॉकडाऊनच्या नियमावलीमध्ये जिल्हा अंतर्गत बस फेऱ्या बंद आहेत. प्रवास करण्यास मुभा नाही. मुक्ताईनगर आगारातून दररोज एक बस जळगाव येथे व तीच बस जळगाव मुक्ताईनगरला परत अशा दोन फेऱ्या करत आहे, परंतु तालुक्याच्या अंतर्गत मात्र बससेवा बंद आहे.
गेल्या तीन महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने आणि विशेषतः खेड्यापाड्यावर रुग्ण आढळून आल्याने मुक्ताईनगर जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या ही मोठ्या संख्येने वाढलेली दिसून आली. या रुग्णांना घरूनच सोईसुविधा काढा, जेवण व गरम पाणी पुरवता यावे तसेच काढा व गरम पाण्याचीदेखील सोय करता यावी म्हणून तालुक्यातील विविध छोट्या-छोट्या खेड्यांमधून रुग्णांचे नातेवाईक मुक्ताईनगरकडे धाव घेत आहेत. मात्र मुक्ताईनगरसाठी बससेवाही सुरू नसल्याने खासगी वाहनधारकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची लूट केली जात आहे. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली जाण्यासाठी ८० रुपये भाडे, तर कुऱ्हा येथे जाण्यासाठी १०० रुपये भाडे आकारले जात आहे. बसचे भाडे ३० व ३५ रुपये अनुक्रमे असताना तीन पटीने अव्वाच्या सव्वा भाडे आकारून रुग्णांच्या नातेवाईकांची व प्रवाशांची अक्षरशः लूट केली जात आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून हीच परिस्थिती असून त्यासाठी नागरिक व प्रवासी खासगी वाहने करतात. हजारो रुपये भाडे देऊन किंवा मोटारसायकलने जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्यामुळे किमान तालुका अंतर्गत बससेवा तरी सुरू करण्यात यावी.
मुक्ताईनगर येथून कुऱ्हा ,अंतुर्ली चांगदेव व बोदवड साठी बससेवा सुरू करण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही. किमान एक बस जाण्यासाठी व सायंकाळी परतण्यासाठी दुसरी बस अशा दोन बस तरी असाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. तालुक्यातील खेडेगावातून बस सेवा सुरू असल्यास तेच प्रवासी जळगावसाठीसुद्धा पुढच्या बसला जाऊन प्रवासी मिळू शकतात. हा विचार एसटी आगाराने करावा व तत्काळ बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.