अमळनेरच्या उपनगराध्यक्षासह १३ जणांवर दरोडा व लुटमारीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:43 IST2019-09-17T00:19:45+5:302019-09-17T00:43:52+5:30
गणेश विसर्जनात राजकीय वादातून घडला प्रकार

अमळनेरच्या उपनगराध्यक्षासह १३ जणांवर दरोडा व लुटमारीचा गुन्हा
अमळनेर : गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटात दंगल होऊन दोन्ही गटातील एकूण १३ जणांविरुद्ध दरोडा तसेच जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळीवाडा भागात १२ रोजी श्रीकृष्ण मंदिराजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना धक्काबुक्की झाल्यावरून या प्रकाराची सुरुवात झाली.
या प्रकरणी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, भारत महाजन, देविदास उर्फ बापू महाजन, राजेंद्र लांबोले, मंगेश महाजन उर्फ चिकू व शुभम महाजन या आठही जणांविरुद्ध अतुल महाजन यांनी फिर्याद दिल्यावरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गटातर्फे भारत महाजन याने दिलेल्या फिर्यादीवरून शांताराम महाजन, भूषण महाजन, अतुल महाजन, राजेंद्र महाजन, प्रितेश सोनार या पाचजणांंविरुद्ध दंगल व जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत. दरम्यान, राजकीय वादातून हा प्रकार घडून आला असल्याचे समजते.