नदीला पूर, गावाला पूल नाही, पुनर्वसन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:36+5:302021-09-05T04:19:36+5:30
अमळनेर : सात्री गावात ७० ते ८० व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आहेत. बोरी नदीला पूर आल्याने व गावाला पूल ...

नदीला पूर, गावाला पूल नाही, पुनर्वसन रखडले
अमळनेर : सात्री गावात ७० ते ८० व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण आहेत. बोरी नदीला पूर आल्याने व गावाला पूल नसल्याने रुग्णांना दवाखान्यात नेता येत नाही. डॉक्टरांना गावात येता येत नाही, पुनर्वसनही होत नाही. आम्ही जगावे की मरावे? अशी संतप्त भावना पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे अशासकीय सदस्य महेंद्र बोरसे यांनी सात्री गावच्या पुनर्वसन गावठाणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक व जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांसमोर भावना व्यक्त केल्या.
अपर जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन प्रशासक प्रवीण महाजन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रवींद्र भारदे, निम्न तापी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, तहसीलदार मिलिंद वाघ, जिल्हा पुनर्वसन व पुनर्विलोकन समितीचे प्रशासकीय सदस्य महेंद्र बोरसे, ठेकेदार दिनेश शिसोदे यांनी पुनर्वसित सात्री गावठाणला भेट दिली. यावेळी महेंद्र बोरसे यांनी तक्रार केली की, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सात्री गावाला जायला बोरी नदीवर पूल नाही. आताही बोरीला पूर आल्याने जीव धोक्यात घालून खाटेवर नदी पार करावी लागते. २०१३ पासून पुनर्वसन प्रक्रिया रखडली असून, फक्त ६० ते ६५ टक्के काम झाले आहे. अद्याप गृह संपादन झालेले नाही. बाधितांची संख्या निश्चित झालेली नाही. त्यानंतर पुनर्स्थापना करायची असते. मात्र, भूसंपादन अधिकाऱ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे तीन वेळा प्रस्ताव व्यपगत झाले आणि कुटुंब संख्येतील तफावत लक्षात आणून दिल्यानंतर १० जून १४ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीतील उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही, अशीही तक्रार बोरसे यांनी केली.
अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तेथून आल्यावर सायंकाळी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात बैठक घेऊन भूमिअभिलेख अधिकारी अहिरे यांना पण मुदतीत कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
040921\04jal_2_04092021_12.jpg
अधिकाऱ्यांच्या पाहणीच्यावेळी अशासकीय सदस्यांची संतप्त भावना