पातोंडा, ता.अमळनेर : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा उलटली. यात पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना चोपडा -अमळनेर रस्त्यावरील शिंदेनगरजवळ सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
जखमींना न्यू प्लॉट भागातील तरुणांनी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले मात्र आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे ग्रामस्थानीं रोष व्यक्त केला. चोपडा अमळनेर रस्त्याने चोपड्याकडून पॅजियो रिक्षा आठ जणांना घेऊन धुळ्याकडे जात होती. याचवेळी रस्त्यात कुत्रा आडवा आला. यावेळी पावसामुळे रस्ताही ओला होता. चालकाने अचानक ब्रेक लावल्याने चालती रिक्षा उलटली आणि आठही प्रवासी रस्त्यावर पडले. यावेळी समोरच न्यू प्लॉट भागातील काही तरुण बसले होते. त्यांनी घटनास्थळ गाठत मदत केली. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अविनाश मोरे (१८), रामदास भिल ( ७०), कलाबाई भिल ( ६५), अलकाबाई मोरे ( ५०), सुदाम मोरे (५२, सर्व राहणार वाडी भोकर ,धुळे) यांचा समावेश आहे.
प्लॉट भागातील तरुण सर्व जखमींना पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. मात्र येथे डॉक्टरसह कुणीच कर्मचारी नसल्याने गावातील लोकांचा रोष वाढला व संताप व्यक्त केला. बघता बघता यावेळी बहुसंख्य लोक जमा झाले. उपस्थित काही लोकांनी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना फोन ही लावले. तरीही एकही हजर झाले नाही. जखमींना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने शेवटी १०८ ॲम्ब्यूलन्सने पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र हे रोज दुपारनंतर बहुतेक वेळी बंदच असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.येथे कर्मचारी ही राहत नाही. यामुळे अचानक काही घटना झाल्यास पेशंटला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळी भयानक परिस्थिती असते. कायम कर्मचारी कमतरता असल्याचे कारण आरोग्य केंद्रामार्फत सांगितले जाते. तरी येथे कायमस्वरूपी रात्री व दिवसा निवासी डॉक्टर व कर्मचारी असावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.