रिक्षा चालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:37+5:302021-09-21T04:19:37+5:30
जळगाव : सध्या शहरात वाहतूक कोंडीला मुख्यत्वे जबाबदार असतील तर काही मोजक्या रक्षा चालकांचा बेशिस्तपणाच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन ...

रिक्षा चालकांचे कधी राईट, तर कधी लेफ्ट; पळवापळवीने प्रवाशांचा वैताग !
जळगाव : सध्या शहरात वाहतूक कोंडीला मुख्यत्वे जबाबदार असतील तर काही मोजक्या रक्षा चालकांचा बेशिस्तपणाच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात रिक्षा चालक आघाडीवर असून प्रवाशांच्या पळवापळवीमुळे रिक्षा भर रस्त्यावर आणल्या जातात तर कधी कधी दुसऱ्या वाहनाच्या समोर रिक्षा थांबवतात. काही रिक्षा चालक प्रामाणिकपणे नियमही पाळतात आणि प्रवाशांना सौजन्याची वागणुकही देत असल्याचे देखील उदाहरणे आहेत. पोलीस अधीक्षक व शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयाच्या समोरच रिक्षाचालकांकडून प्रवाशांची पळवापळवी होते. नवीन बसस्थानकातून बाहेर आलेल्या प्रवाशाला थेट घेरलेच जाते, काही जण तर हात धरुन प्रवाशाला घेऊन जातात.
दरम्यान, शहरात एका मार्गावर खरे तर पंधरा रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. परंतु काही मोजके रिक्षा चालक हे भाडे आकारतात. मुख्य रस्ता सोडून उपरस्ता किंवा कॉलनीत जायचे असेल तर अगदी मनमानी पध्दतीने भाडे आकारले जाते. एखादी व्यक्ती परजिल्ह्यातून शहरात आला असेल व त्याला तेथून यायला जितके भाडे लागत नाही, त्यापेक्षाही जास्त भाडे रिक्षा चालक शहरात कॉलन्यांमध्ये जाण्यासाठी आकारतात. संपूर्ण शहर पाच ते सात किलोमीटर अंतरात सामावलेले आहे, त्यामुळे त्याचे दर कसे असावेत यावर नियमच नाही, त्यामुळे मनमानी पध्दतीला वाव मिळत आहे. प्रवासी मिळविण्यासाठी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन केले जाते. आपल्यामुळे वाहतूक कोंडी होईल, किंवा कोणाला अडथळा निर्माण होईल, याचा विचार अजिबात केला जात नाही. वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाई होते, मात्र त्याचा फारसा परिणाम होत नाही. पोलीस डोळ्यासमोर असले की नियमांचे पालन करायचे नंतर ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती आहे.