जळगाव जिल्ह्यात आठ वाळू गटांच्या लिलावातून साडे सात कोटींवर महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:17 IST2021-03-25T04:17:02+5:302021-03-25T04:17:02+5:30
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांपैकी केवळ आठ गटांचे लिलाव झाले असून त्यातून सात कोटी ५८ लाख ...

जळगाव जिल्ह्यात आठ वाळू गटांच्या लिलावातून साडे सात कोटींवर महसूल
जळगाव : जिल्ह्यातील २१ पैकी आठ वाळू गटांपैकी केवळ आठ गटांचे लिलाव झाले असून त्यातून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र १३ वाळू गटांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची हातची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा काढण्यात आली आहे. २५ मार्च रोजी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.
दरम्यान, वाळू गटांचे लिलाव झाले नाही तरी जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असते. यातून झालेल्या अपघातात २०२० या वर्षात ६८ जणांना जीव गमवावा लागला आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीच्या वाळूला मोठी मागणी असल्याने जिल्ह्यातून बाराही महिने वाळूचा बेसुमार उपसा सुरू असतो. त्यात गेल्या अनेक दिवसांपासून पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळत नसल्याने वाळू गटांचे लिलाव रखडले होते. अखेर पर्यावरण समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील २१ वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. २० जानेवारी रोजी निविदा उघडण्यात आल्यानंतर केवळ आठ वाळू गटांचा लिलाव झाला. यात बांभोरी, घाडवेल (ता. चोपडा), आव्हाणी (ता. धरणगाव), नारणे, वैजनाथ, टाकरखेडा , उत्राण १, उत्राण २ या आठ वाळू गटांचे लिलाव होऊन त्यातून सात कोटी ५८ लाख ५७ हजार ४३६ रुपयांचा महसूल मिळाला. मात्र जळगाव तालुक्यातील भोकर आणि पळसोद, एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा, रावेर तालुक्यातील वडगाव, आंदलवाडी, निंभोरा बु., केऱ्हाळे बु., धुरखेडा, पातोंडी, दोधे, बलवाडी, अमळनेर तालुक्यातील धावडे, सावखेडा या गटांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या वाळू गटांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे फेरनिविदा प्रक्रिया राबविली गेली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर २५ टक्के हातची किंमत कमी करून फेरनिविदा काढण्यात आली. आलेल्या निविदा २५ मार्च रोजी उघडल्या जाणार असून आता २५ टक्के हातची किंमत कमी करूनही किती गटांना प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष आहे.
वाळूच्या लिलावात ज्या गटांचा लिलाव झाला त्यातून उचल करताना लिलाव न झालेल्या गटातूनही वाळू उचलली जाते. या नेहमीचा अनुभव असल्याने शक्यतो इतर गटांना प्रतिसाद मिळत नाही. याच कारणामुळेही यंदा उर्वरित वाळू गटांचे लिलाव रखडत असल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू वाहनांमुळे ६८ जण ठार
जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ रस्ता अपघात झाले त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी १५ टक्के अपघात हे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर, डंपर आदींमुळे झालेले आहेत. प्रत्येक अपघात जीव गेलेला आहे. वर्षभरात वाहनांमुळे अंदाजे ६८ ते ७५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत देखील वाळू वाहनांमुळे अपघाताच्या सहा ते सात घटना घडलेल्या आहेत. याच महिन्यात इच्छा देवी चौकात वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत कंपनीत जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय अजिंठा चौक, रेमंड चौकातही वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे अपघात होऊन निष्पाप तरुणांचा जीव गेलेला आहे. अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या ७० टक्के आहे. त्यात दुचाकीस्वारांची टक्केवारी ३६.५ इतकी आहे.
—————————-
जिल्ह्यातील आठ वाळू गटांचे लिलाव झाले असून उर्वरित वाळू गटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करून फेरनिविदा मागविल्या आहे. जिल्ह्याला गौण खनिज महसुलाचे १०५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट असून ते साध्य होईल.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.