परतीच्या पावसामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता
By Admin | Updated: October 17, 2015 00:22 IST2015-10-17T00:22:37+5:302015-10-17T00:22:37+5:30
रांझणी/मोदलपाडा : तळोदा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.

परतीच्या पावसामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता
रांझणी/मोदलपाडा : तळोदा तालुक्यातील रांझणी व मोदलपाडा परिसरात परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे कपाशी, सोयाबीन, मका, ज्वारी आदी पिकांची पेरणी शेतक:यांनी केली होती. मध्यंतरी पावसाने मोठी ओढ दिल्याने बागायती पिके अडचणीत आली होती. मात्र परतीचा पाऊस व पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात घट येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. भाद्रपद महिन्याच्या उन्हात पांढरेशुभ्र दिसणारे कापसाचे क्षेत्र लाल्या रोगामुळे सध्या लालभडक दिसत आहे. या रोगामुळे कपाशीची पाने, फुले, बोंडे गळून नुकसानीची भीती शेतकरी बांधव व्यक्त करीत आहेत. यंदा पेरणीनंतर चार ते पाच दिवस पाऊस पडला. त्यानंतर एक ते दीड महिन्याची दांडी मारल्याने विहीर, बोअरवेलला पाणी होते त्यावर कपाशी व इतर पिके जगविता आली. कपाशी लागवडीपासून तर काढण्यार्पयत शेतकरी या पिकाची काळजी घेत असतो. पाच ते सहा वेळा कोळपणी, निंदणीसह कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. तसेच रासायनिक खतांची मात्रा वेगळीच द्यावी लागते. एवढा खर्च व मेहनत करून जो कापूस घरात येईल तेवढेच खरे उत्पन्न मिळते. तालुक्यातील इतर भागांमध्ये एरंडी, सूर्यफूल आदी पिकांची लागवड करण्यात आली. परंतु संततधार पावसाने ही पिकेसुद्धा जमीनदोस्त झाली असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. या वेळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. परंतु पावसामुळे लवकर पेरणी करण्यात आलेल्या मका, बाजरी, ज्वारी, तूर, कपाशीसारख्या पिकांचे नुकसानकारक चित्र आहे. तसेच संततधार पावसाने चार ते पाच दिवस सातत्य ठेवल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने परिसरातील पाणी पातळीत सहा ते सात फुटाने वाढ झाली. परंतु लाल्यामुळे अपेक्षित असणारे उत्पादन मिळण्याची शक्यता दिसत नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात लागवड करण्यात आलेल्या कापसाच्या वेचणीला पावसामुळे अडथळा आल्याने कापसाने कोंब काढल्याचे चित्र आहे. त्यामुळे उत्पन्नात घट निर्माण होणार आहे. (वार्ताहर)