माहिती नाकारल्याने सेवानिवृत्त उपकुलसचिवांना १० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST2021-03-28T04:16:03+5:302021-03-28T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चुकीचे कारण देवून अर्जदारास माहिती नाकारल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलसचिव ...

माहिती नाकारल्याने सेवानिवृत्त उपकुलसचिवांना १० हजारांचा दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चुकीचे कारण देवून अर्जदारास माहिती नाकारल्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलसचिव तथा जनमाहिती अधिकारी राजेश जे. वळवी यांना राज्य माहिती आयोग, नाशिक यांनी १० हजार रूपये दंड केला आहे. राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी नुकताच हा आदेश पारीत केला असून दंडाची रक्कम दोन टप्प्यात भरण्याची आदेशात नमुद केले आहे.
अर्जदार डॉ. संजय कृष्णाजी भोकरडोळे यांनी ८ जुलै २०१६ रोजी माहिती मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, अर्जातील माहिती विनाअनुदानित शैक्षणिक तुकडीशी संबंधित असल्याचे कारण सांगून वळवी यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर डॉ.भोकरडोळे यांनी प्रथम अपील केले होते. प्रथम अपिलीय अधिका-यांनी अर्जदारास नस्तीचा शोध घेण्याची परवानगी दिली. मात्र, नस्तीचा शोध घेवून अर्जदाराने माहितीची मागणी केली असता, सदर मागणी केलेली माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्याने ती देता येत नाही, असे डॉ.भोकरडोळे यांना वळवी यांनी कळविले. दरम्यान, माहिती नाकारल्याने भोकरडोळे यांनी नाशिक येथील राज्य माहिती आयोग खंडपीठात द्वितीय अपील दाखल केले. त्यानंतर सुनावणी होवून अर्जदारास माहिती देण्याचे आदेश केले.
खुलासा नाकारत केला दंड
सन २०१९ मध्ये तत्कालीन उपकुलसचिव यांनी राज्य माहिती आयोगाकडे खुलासा सादर केला. या खुलाशावर राज्य आयोगाने नुकतेच २८ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन सुनावणी घेतली. वळवी यांनी दाखल केलेला खुलासा राज्य आयोग्य माहिती आयुक्त बिश्नोई यांनी अमान्य केला. दंडाची रक्कम ही वेतनातून दोन समान मासिक हप्त्यात वसूल करून शासकीय खात्यात भरावी, असे आदेशात म्हटले आहे.