शहरी भागातही रोहयो कामे सुरू करण्याचा पारोळा पालिका सभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:37+5:302021-09-03T04:16:37+5:30
पारोळा : येथील नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष करण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. यात एकूण ४६ विषयांना ...

शहरी भागातही रोहयो कामे सुरू करण्याचा पारोळा पालिका सभेत ठराव
पारोळा : येथील नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष करण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सर्वसाधारण सभा झाली. यात एकूण ४६ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. यात पालिकेचे दोन कर्मचारी मरण पावले होते. त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरी देण्याचे ठरले. शहरी भागातही रोहयोची कामे सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील उपस्थित होते. शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातही रोजगार हमी योजना सुरू करण्याबाबतचा ठराव करणारी जिल्ह्यात ही पहिली नगरपालिका ठरली. या योजनेत शहरातील विहिरींचा गाळ काढणे, खासगी बोअरवेलला पालिकेकडून फिल्टर बसविण्यात येणार आहे. वृक्षारोपण करणे, रोपवाटिका निर्माण करणे, खडीकरण करणे, शहर हद्दीत असलेल्या शेतकऱ्यांना विहिरी देणे अशी कामे कृती आराखड्यात सुचविण्यात आली.
या वेळी डॉ. केशवराव जोशी महाराज अन्नछत्र मंडळ व चॅरिटेबल ट्रस्टला २४ तास अन्नदान करण्यासाठी पालिकेने जागा मंजूर केली. अनेक भागांत रस्ते गटारींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. नवीन वसाहतीत पाणीपुरवठा पाइपलाइन, दिवाबत्ती, महिला शौचालयाचे नूतनीकरण व नव्याने बांधकाम करण्यासाठी ही मंजुरी सभेत देण्यात आली.
या वेळी विरोधी शहर विकास आघाडीच्या गटनेत्यांसह दोन नगरसेवक यांनी विकासकामांच्या विषयांना हरकती घेतल्याची माहिती नगराध्यक्ष करण पाटील यांनी पत्रकारांना दिली.
नगरसेविका सुनीता वाणी यांनी बोरी धरण १०० टक्के भरले आहे. पाणीपुरवठा तीन दिवसांआड करावा, अशी मागणी सभागृहात केली. विषय वाचन अभिजित मुंदाणकर यांनी केले.
या वेळी सभागृहात गटनेते बापू महाजन, महिला बालकल्याण सभापती अंजली पाटील, पाणीपुरवठा सभापती वैशाली पाटील, आरोग्य सभापती नवल चौधरी, नगरसेवक मनीष पाटील, कैलास चौधरी, प्रकाश महाजन, पी.जी. पाटील, नगरसेविका रेखा चौधरी, जयश्री बडगुजर, सुनीता वाणी आदी उपस्थित होते.