व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटरच्या चौकशी अधिकाऱ्याची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:38 IST2021-09-02T04:38:26+5:302021-09-02T04:38:26+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयाने खरेदी केलेल्या व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटरमध्ये लक्षावधीचा घोळ झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली ...

Replacement of ventilator and concentrator inquiry officer | व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटरच्या चौकशी अधिकाऱ्याची बदली

व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटरच्या चौकशी अधिकाऱ्याची बदली

जिल्हा सामान्य रुग्णालयाने खरेदी केलेल्या व्हेंटिलेटर व कॉन्सन्ट्रेटरमध्ये लक्षावधीचा घोळ झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केली होती. लोकमतने या प्रकरणावर आवाज उठविला होता. त्यानंतर या दोन्ही यंत्राची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. जिल्हा रुग्णालयातील नेत्र चिकित्सक तथा प्रशासन अधिकारी डॉ. उल्हास तासखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीने व्हेंटिलेटर खरेदीची चौकशी केली तर कॉन्सन्ट्रेटर खरेदीची चौकशी अद्याप सुरू आहे. चौकशी समितीने अहवालात ताशेरे ओढल्याचे सांगितले जात असतानाच त्यांची उचलबांगडी झाली.

जीएम पोर्टलवर मॅक्स प्रोटॉन प्लस मशीनची किंमत १२ लाख ३८ हजार ४७१ रुपये इतकी दाखविण्यात आलेली आहे; मात्र बाजारात मूल्य ५ लाख १३ हजार इतके आहे. लहान मुले आणि मोठ्या व्यक्तींसाठी मशीन खरेदी करायची असल्याचे दाखविले; परंतु प्रत्यक्षात नवजात शिशूंसाठी लागणारे १५ तर मोठ्या व्यक्तींसाठी १५ अशी ३० मशीन दाखल झालेली आहेत. त्यातही नामांकित ब्रँडऐवजी दुसऱ्याच ब्रॅंडची मशीन मागविण्यात आली आहे. मशीन खरेदीसाठी तज्ज्ञ समिती नेमणे अपेक्षित असताना ती नेमण्यात आलेली नाही, अशी तक्रार भोळे यांनी केलेली आहे.

याआधीदेखील या प्रकरणात तक्रारदाराला परस्पर माहिती दिली म्हणून भांडारपाल व कनिष्ठ लिपिक यांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. आतादेखील चौकशी अधिकाऱ्याचीच बदली झाल्याने हे प्रकरण संगनमताने दडपले जात असल्याचे भाळे यांचे म्हणणे आहे.

Web Title: Replacement of ventilator and concentrator inquiry officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.