अडावद-चोपडा रस्त्याच्या डागडुगीस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:55+5:302021-08-24T04:20:55+5:30
लोकमत इफेक्ट अडावद ता. चोपडा : ‘अडावद-चोपडा रस्त्याची दयनीय अवस्था’ अशा ठळक मथळ्याखाली सचित्र वृत्त लोकमतने २२ रोजी ...

अडावद-चोपडा रस्त्याच्या डागडुगीस सुरुवात
लोकमत इफेक्ट
अडावद ता. चोपडा : ‘अडावद-चोपडा रस्त्याची दयनीय अवस्था’ अशा ठळक मथळ्याखाली सचित्र वृत्त लोकमतने २२ रोजी प्रसिद्ध करताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यांनी तत्काळ रस्त्याच्या डागडुगीस सुरुवात केली आहे. रस्त्यावर कच्चा मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सोमवार २३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. परंतु थातूर-मातूर काम करून वेळ मारून घेण्याच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अंत्यत वर्दळीच्या अशा अडावद-चोपडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी म्हणण्याची वेळ आलेली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याकडे सफशेल दुर्लक्ष झालेले आहे. या रस्त्याच्या परिस्थितीवर प्रकाश टाकीत लोकमतने रविवार २२ रोजी वृत्त प्रकाशित करुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. यावर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यवाहीची मलमपट्टी करण्यात येत आहे. कच्चा मुरुम टाकून खड्डे बुजविण्यात येत असल्याने पाऊस पडताच या ठिकाणी चिखल होईल. यामुळे रस्ता वापरणाऱ्या वाहनचालकांना खड्ड्यांबरोबर चिखलातून मार्गक्रमण करावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर, खडी टाकून पक्की डागडुजी करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया -
सध्या पावसाचे दिवस असल्याने डांबर टाकून खड्डे बुजविणे जिकिरीचे आहे. त्यामुळे मुरुम टाकून खड्डे बुजविले जात आहेत. अडावद ते वर्डी फाट्यापर्यंतच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून पावसाळा ओसरताच या कामास सुरुवात होईल.
पी. जे. सुशिर (सहाय्यक अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,चोपडा)
फोटो कॅप्शन- अडावद-चोपडा रस्त्यावर कच्चा मुरूम टाकून मजुरांनी डागडुजी केली.