तळमजल्यात लपविलेल्या ‘त्या’ २५ फाईल्स कंडारेने दिल्या काढून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:41+5:302021-07-07T04:21:41+5:30
जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला घेऊन पुणे पोलीस जळगावात आले असता, कंडारेने संस्थेच्या मुख्य कार्यालयात ...

तळमजल्यात लपविलेल्या ‘त्या’ २५ फाईल्स कंडारेने दिल्या काढून
जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार जितेंद्र कंडारे याला घेऊन पुणे पोलीस जळगावात आले असता, कंडारेने संस्थेच्या मुख्य कार्यालयात लपविलेल्या २५ महत्त्वपूर्ण फाईल्स त्याने स्वत:च पोलिसांना काढून दिल्या. त्यात कर्जप्रकरणाची अत्यंत महत्त्वाची माहिती असून अनेकांची नावे आहेत. तत्पूर्वी कंडारेच्या शिवाजी नगरातील घराचीही झडती घेण्यात आली, मात्र तेथे काहीच आढळून आले नसल्याची माहिती तपासाधिकारी तथा पोलीस निरीक्षक सुचेता खोकले यांनी ‘लोकमत’ला दिली.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जितेंद्र कंडारे याला घेऊन सोमवारी दुपारी जळगावात आले होते. याची माहिती त्यांनी गोपनीय ठेवली होती. सोमवारी दुपारी तीन ते रात्री ९ वाजेपर्यंत पथकाने बीएचआर संस्थेतून त्या फाईल्स काढून चौकशी केली. नूतन अवसायक चैतन्य नासरे यांचीही पथकाने भेट घेऊन माहिती जाणून घेतली. मंगळवारी देखील दुपारी तीन वाजेपर्यंत कागदपत्रांची पडताळणी व इतर चौकशी करून पथक अजिंठा विश्रामगृहावर गेले. तेथून पाच वाजता ते कंडारेला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार असलेला मुख्य संशयित जितेंद्र कंडारेला सात महिन्यांनंतर २८ जून रोजी इंदूर येथून ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी अटक केली. सध्या तो दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, पोलीस कोठडीत त्याच्याकडून गुन्ह्यासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे संकलित करण्याचे काम सुरू आहे. संशयित जितेंद्र कंडारे याला सोबत घेत पोलीस निरीक्षक सुचेता खोकले, निरीक्षक भोसले व सहा कर्मचारी अशा आठ जणांचे पथक जळगावात आले होते.
तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर पथक रवाना
सोमवारी सहा तास व मंगळवारी सहा तास अशे एकूण १२ तास चौकशी करून व कागदपत्रे संकलित करून पथक मंगळवारी पुण्याकडे रवाना झाले. कंडारेला अटक केल्यानंतर त्याने या फायलींची माहिती पोलिसांना दिली. बेकायदेशीरपणे कोट्यवधीचे कर्ज वाटप, पावत्या मॅचिंग, तसेच कर्जफेड केल्याबाबत निरंक दाखला आदींची माहिती यात आहे.
कोट..
बीएचआरच्या मुख्य कार्यालयातून २५ फाईल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. कंडारेची घरझडती घेतली, परंतु त्यात काहीच मिळाले नाही. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास खूप दिवस चालणार आहे. जशी जशी माहिती व पुरावे समोर येत आहेत, त्यानुसार कारवाई केली जात आहे. तपासासाठी आणखी जळगावला यावेच लागणार आहे.
- सुचेता खोकले, तपासाधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा