प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या गावांवरील अन्याय दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:23 IST2021-09-16T04:23:08+5:302021-09-16T04:23:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पारोळा : प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या गावांवरील अन्याय दूर झाला असून, ग्रामपंचायतीना स्वतंत्र वीज बिल देण्यात येणार ...

प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या गावांवरील अन्याय दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : प्रामाणिकपणे बिले भरणाऱ्या गावांवरील अन्याय दूर झाला असून, ग्रामपंचायतीना स्वतंत्र वीज बिल देण्यात येणार आहे. यासंबंधी जि. प. सदस्य रोहन सतीश पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
तामसवाडी ता. पारोळा येथील बोरी धरणावरून ११ गावांची सामूहिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेसाठी सामूहिक वीजबिल भरणा हा करावा लागतो. पण काही ग्रामपंचायती वीजबिल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्याचा परिणाम या योजनेत असलेल्या सर्व ग्रामपंचायतींना भोगावा लागत असे व त्यांचाही पाणीपुरवठा वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित केला जात असे. हा त्रास टाळण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना स्वतंत्र वीजबिल देण्यात यावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत हा विषय चांगलाच राहून धरला. प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या ग्रामपंचायतींना कसा त्रास सहन करावा लागतो ते सभेत पटवून दिले. त्यावर सामूहिक पाणीपुरवठा असलेल्या ग्रामपंचायतींना स्वतंत्रपणे बिले अदा करण्यात यावे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची बैठक १४ रोजी झाली. यावेळी सामूहिक पाणी योजनांची थकबाकी हा मुद्दा चर्चेत आला त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी पारोळा तालुक्यातील तामसवाडी बोरी धरणावरून ११ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या सामूहिक पाणीपुरवठा योजनेबाबत मुद्दा उपस्थित केला.
या योजनेंतर्गत तामसवाडी, बोळे, मुंदाणे, करंजी, शेवगे, बोळेतांडा यासह ११ गावांना सामूहिक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या सर्व गावांना सामूहिक पाणी पुरवठा असल्याने वीजबिल देखील सामूहिक येते. काही ग्रामपंचायती हे बिले प्रामाणिकपणे भरतात. पण काही ग्रामपंचायत थकीत असतात. यामुळे सरसकट सर्व गावांचा पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे सर्वच गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प होतात. या पध्दतीमुळे इतर गावांवर अन्याय होत असल्याचे जि.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिले.