दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा, वाघूर नदीला पहिला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:40+5:302021-09-06T04:19:40+5:30
पहूर, ता. जामनेर : अर्धा पावसाळा उलटला तरीही वाघूर नदीसह परिसरातील धरणे कोरडेठाक असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती होती. शनिवारी ...

दुष्काळसदृश परिस्थितीत दिलासा, वाघूर नदीला पहिला पूर
पहूर, ता. जामनेर : अर्धा पावसाळा उलटला तरीही वाघूर नदीसह परिसरातील धरणे कोरडेठाक असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती होती. शनिवारी रात्री अजिंठा डोंगरमाथ्यावर पाऊस झाल्याने वाघूर नदीला पावसाळ्यातील पहिला पूर आला असून पोळा सणाच्या निमित्ताने बैल धुण्यासाठी नदीला पाणी आल्याने शेतकरीवर्गाची चिंता मिटली आहे. वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्यावर्षी वाघूर नदीला पोळा सणापर्यंत पाच ते सात पूर येऊन गेले. यंदा पावसाळा अर्धा झाला. पोळा सण एक दिवसावर येऊन ठेपला, तरीही बैल धुण्यासाठी शेतकऱ्यांना नदीला पाणी नव्हते. परिसरातील कमानी, मोयगाव, शेरी, गोगडी, देवळी धरणांमध्ये मृत साठा शिल्लक असल्याचे लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आर.बी. पाटील यांनी सांगितले आहे. मध्यंतरी, पावसाने महिनाभर उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला. अधूनमधून येणाऱ्या पावसाने पीकपरिस्थिती चांगली, असे म्हणावे लागेल.
पावसाने वेळेत हजेरी न लावल्याने येणा-या खरीप हंगामाच्या उत्पन्नात घट होणार असल्याचे शेतकरी बोलतात. धरणांमध्ये पाणी नसल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे दिसत होते. त्यामुळे पहूरसह परिसरात दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट पहूरकरांवर घोंघावत होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण, नदीला पूर नव्हता. मात्र, वाघूर नदीचा उगम अजिंठा डोंगररांगातून आहे. शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने मध्यरात्री वाघूर नदीला मोठा पहिला पूर आला आहे. त्यामुळे बैल पोळा सणाला चैतन्यमय वातावरण शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले आहे.
परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीला आलेल्या पहिल्या पुराने नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे काहीअंशी दिलासा म्हणावा लागेल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
पहिल्या पुराचे पूजन
वाघूर नदीला पहिला पूर पोळ्याच्या पूर्वसंध्येला आल्याने आनंदाचे वातावरण तयार झाले. परंपरेनुसार पहूर पेठ ग्रामपंचायत सरपंच नीता पाटील, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज समितीप्रमुख रामेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य कविता देशमुख, ईश्वर देशमुख व ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील, भारत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत साडीचोळी, ओटी भरून पूजन केले. यावेळी माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, भाजप शहराध्यक्ष संदीप बेढे, माजी सैनिक भगवान देशमुख, गोकुळ पाटील, पिंटू देशमुख उपस्थित होते.
050921\05jal_5_05092021_12.jpg
पहूर येथे वाघूर नदीला आलेल्या पहिल्या पुराचे पूजन करताना निता पाटील, कविता देशमुख, संगीता पाटील, ईश्वर देशमुख, रामेश्वर पाटील, भारत पाटील, राजधर पांढरे आदी.