पंच म्हणून सहीस नकार, दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:55+5:302021-07-22T04:12:55+5:30
वरणगाव, ता.भुसावळ : सरकारी पंच म्हणून सह्या करण्यास नकार देणाऱ्या नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल ...

पंच म्हणून सहीस नकार, दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा
वरणगाव, ता.भुसावळ : सरकारी पंच म्हणून सह्या करण्यास नकार देणाऱ्या नगरपरिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील सिद्धेश्वरनगरमध्ये १९ जुलै रोजी अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती वरणगाव पोलिसांना मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या पथकाला धक्काबुक्की करण्यात आली व वीट मारून फेकली. यात एक पोलीस जखमी झाला. पोलीस सूत्रांनुसार, सिद्धेश्वरनगरमधील फकीर वाडा परिसरात प्रमिला दशरथ सोनवणे व दशरथ सुकदेव सोनवणे हे दारू विक्री करून पिणाऱ्यांची गर्दी जमवत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेथे शहानिशा करण्यासाठी पथक गेले असता, त्यांना दोघांनी धक्काबुक्की केली व वीट फेकून मारली. ती पथकातील पो.कॉ. मनोहर पाटील यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर लागली. त्यात ते जखमी झाले. पंचनाम्यात घरातून पाच लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली.
दरम्यान, नगरपरिषदेतील कर्मचारी पंकज सुरेश सूर्यवंशी व गणेश रामचंद्र चाटे यांनी या धाडीच्या ठिकाणी सरकारी पंच म्हणून सही करण्यास नकार दिला, म्हणून त्यांच्याविरुद्धही सहायक फौजदार नरसिंग महारू चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यावरून कलम १८६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी विवेकलावंड यांनी वरणगाव येथे भेट दिली. तपास सपोनि संदीपकुमार बोरसे करीत आहेत.