कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी २०० पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 09:13 PM2021-03-06T21:13:23+5:302021-03-06T21:13:23+5:30

कोरोनायोद्धा यांना पुन्हा बोलावले : कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली

Recruitment of 200 posts to fight Corona | कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी २०० पदांची भरती

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी २०० पदांची भरती

Next

जळगाव : कोरोनाकाळात मनुष्यबळाच्या मुद्याने आरोग्यसेवेवर परिणाम व्हायला नको म्हणून कंत्राटीपद्धतीने कोरोना असेपर्यंत डॉक्टर, स्टाफ नर्सेस, तंत्रज्ञ, डाटा एण्ट्री ऑपरेटर यांची जवळपास २५० पदे भरण्यात आली होती. कोरोनात काम केल्यानंतर यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना कमी होत असल्याने कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र, आता कोरोना पुन्हा वाढू लागल्याने यातील २०० कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात आले असून हळूहळू ते रुजू होत आहेत.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत होता. डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यांत अगदीच कमी प्रमाणात रुग्ण समोर येत होते. अनेक तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत होते. जळगाव शहरातील अगदीच दहापेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा विस्फोट झाला व नियमित सरासरी चारशेपेक्षा अधिक रुग्ण समोर यायाला लागले आहेत. अशा स्थितीत बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या केंद्रांवर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता नको म्हणून कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलविण्यात आले आहे.

कोरोनाचे एकूण रुग्ण
६२,६५०

बरे झालेले रुग्ण
५७,६४९

ॲक्टिव्ह केसेस
३६०५

कोरोना बळी
१३९६

आता होत आहेत हळूहळू रुजू

गेल्या वर्षी कंत्राटी पद्धतीने २५० पदे भरण्यात आली होती. यातील काही प्रमुख केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देऊन काही केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर, आता कोविड केअर सेंटर पुन्हा उघडण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलावण्यात आले असून हळूहळू त्यांचे रुजू होण्यासाठी फोन येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.

कायम करण्याची मागणी
कोरोनाच्या अत्यंत दहशतीच्या वातावरणात जेव्हा नातेवाईकही रुग्णाच्या जवळ जात नव्हते, अशा स्थितीत आम्ही सेवा दिली. मात्र, कोरोना संपल्याचे सांगत आम्हाला कार्यमुक्त करण्यात आले होते. आरोग्यसेवेच्या भरतीत आम्हाला प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मध्यंतरी आंदोलनही केले होते. काही कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी याच भावना व्यक्त केल्या.

 

Web Title: Recruitment of 200 posts to fight Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.