मराठी भाषा विद्यापीठाची शिफारस
By Admin | Updated: February 13, 2015 15:37 IST2015-02-13T15:37:06+5:302015-02-13T15:37:06+5:30
प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम या सर्वांमध्ये मराठी भाषेचा विकास कसा होईल यासाठी मराठी भाषा विद्यापीठाद्वारे प्रयत्न करता येईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार डॉ.दत्ता भगत यांनी केले.

मराठी भाषा विद्यापीठाची शिफारस
जळगाव : जागतिकीकरणानंतर नव्या तंत्रज्ञानातील आव्हाने समजून घेत मराठी भाषेचा विकास सुरू आहे. मराठी भाषा विद्यापीठाची शिफारस करण्यात आली असून प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम या सर्वांमध्ये मराठी भाषेचा विकास कसा करता येईल, याबाबत मराठी भाषा विद्यापीठाद्वारे प्रयत्न करता येईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नाटककार तथा मराठी भाषा विकास धोरण समितीचे सदस्य डॉ.दत्ता भगत यांनी केले.
उमविच्या भाषा अभ्यास प्रशाळेतील मराठी विभागाच्यावतीने १२ रोजी मराठी भाषा विकासाच्या धोरणावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. राज्य शासनाने मराठी भाषेच्या विकासाचे येत्या २५ वर्षांचे धोरण आखण्यासाठी डॉ.नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीने तयार केलेल्या अहवालाबाबत चर्चा घडून यावी या भूमिकेतून शासनाने सूचना, हरकती मागविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मराठी विभागाने गुरुवारी विद्यापीठात परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी कुलसचिव डॉ.ए.एम. महाजन, शिक्षण सहसंचालक डॉ.अजय साळी, राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातील अधिकारी विनय मावळणकर, प्रशाळेच्या संचालक डॉ.शोभा शिंदे, विभाग प्रमुख डॉ.म.सु. पगारे उपस्थित होते.
प्रा.भगत म्हणाले की, यापूर्वीही अनेक आव्हानांना सामोरे जात मराठी भाषेचे अस्तित्व टिकून राहिले आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करताना मराठी भाषा आणि तिचा विकास करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने समितीने अहवाल तयार केला आहे. समितीच्या अहवालावर आपले मत मांडण्याचे त्यांनी आवाहन केले.