वेळेचे राखले भान, प्रसृत मातेसह बाळाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:43+5:302021-07-29T04:16:43+5:30
पातोंडा, ता. अमळनेर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच दीड ते दोन महिन्यांपूर्वी मुंबई ...

वेळेचे राखले भान, प्रसृत मातेसह बाळाला मिळाले जीवदान
पातोंडा, ता. अमळनेर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच दीड ते दोन महिन्यांपूर्वी मुंबई नायर हॉस्पिटलमधून आलेले व पातोंडा वैद्यकीय सेवेत रुजू झालेले डॉ. रोशन राजपूत यांनी वेळेचे भान ठेवून आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची अतिशय किचकट व चिंताजनक स्वरूपाची प्रसूती करून बाळंतीण मातेसह बाळाला जीवदान दिले.
जवळच असलेल्या नारखेडे गावातील अनिता भिल (२९) नावाच्या महिलेला प्रसूतीकळा येत होत्या. १०८ रुग्णवाहिनीचे चालक जितेंद्र पाटील यांनी या महिलेला तत्काळ पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल केले. ज्यावेळी ही महिला आली, तेव्हा तिची अवस्था फारच बिकट होती. तिला फारच वेदना होत होत्या. डॉ. रोशन राजपूत यांनी या महिलेची तपासणी केली. महिलेच्या बाळाची नाळ बाळाच्या गळ्याला पूर्णपणे गुंडाळलेली होती. डॉ. रोशन यांना काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. महिला व बाळाच्या जीवनमरणाच्या दृष्टीने अतिशय वेळ कमी होता. अमळनेर येथे पाठविले तर पोहोचण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिटे लागतील, अशा परिस्थितीत बाळ तर दगावले; पण त्याचबरोबर मातेलाही धोका होता.
त्यांनी त्या महिलेला धीर दिला. महिलेच्या बिकट परिस्थितीचे, वेळेचे भान ठेवून मोठ्या हिमतीने आपल्या कौशल्याचा बळावर महिलेची अवघ्या दहा मिनिटांच्या आतच शस्त्रक्रिया करून प्रसूती केली. प्रसूतीवेळी बाळाचे तोंड बाहेर आले असता त्यातच बाळाच्या मानेला नाळ पूर्णपणे गुंडाळलेली होती. अशा बिकट व किचकट अवस्थेत बाळाची नाळ कापली. महिलेची नाजूक प्रसूती सुखरूप होऊन, माता व बाळसुद्धा सुखरूप पाहून वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशन राजपूत यांच्यासह टीमने नि:श्वास सोडला. डॉ. रोशन राजपूत यांच्या या धाडसीवृत्तीचे कौतुक होत आहे. याकामी आरोग्य सेविका एस. बी. गीते, कर्मचारी सचिन शिरसाठ, १०८ चे चालक जितेंद्र पाटील यांचेही सहकार्य लाभले.
बाईट
वेळेचे नियोजन व भान मी राखले. हाच माझा मोठा निर्णय होता. मातेच्या व बाळाला जीवदान देण्याच्या दृष्टीने हा अतिशय उपयुक्त काळ ठरला अन् तो प्रयत्न यशस्वी झाला. आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत, ती भरण्यात यावीत.
-डॉ. रोशन राजपूत
वैद्यकीय अधिकारी, पातोंडा
280721\28jal_8_28072021_12.jpg
डॉ.रोशन राजपूत.