सिडीयम फिडरवर विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विचारपूस केल्यास तांत्रिक कारण दाखवून सहाय्यक अभियंता किंवा वीज कर्मचारी थातूरमातूर उत्तर देऊन मोकळे होतात. म्हणून उपकार्यकारी अभियंता भेले यांना तोंडी सांगितल्यावरही याविषयी गांभीर्याने घेतले जात नाही. या सिडीयम फिडरचे वीज सहाय्यक अभियंता उकलकर यांच्याकडे या भागाचा चार्ज असताना तेदेखील पुरवठा सुरळीत करण्यास किंवा तांत्रिक बिघाड शोधण्यास अकार्यक्षम ठरले आहेत.
वीज ग्राहकांच्या तक्रारीसाठी कंपनीने दिलेले भ्रमणध्वनी हे अधिकारी व कर्मचारी उचलत नाहीत. तसेच वीज वितरण कंपनीमार्फत वीज ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत देणे बंधनकारक असताना वीज ग्राहकांना वेठीस धरत आहे. यावरून वीज वितरण कंपनी अकार्यक्षम ठरत आहे. वीज युनिट दर गगनाला भिडले असतानाही वीज ग्राहक वीज बिल भरण्यास प्राधान्य देतात. त्यात ज्या वीजग्राहकांची परिस्थिती नाही त्यांनी नियमित वीजबिल न भरल्यास वीज कर्मचारी तत्काळ वीज कनेक्शन कट करतात. ती तत्परता दाखविली जाते. त्याचप्रमाणे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी का दाखवली जात नाही. सध्या वातावरणाच्या आर्द्रतेमुळे नागरिक पहिलेच हैराण झाले आहेत.
त्यात सिडीयम फिडरवर दररोज दोन ते तीनवेळा वीजपुरवठा खंडित होत असतो. वीज वितरण कंपनीमार्फत वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वीज ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीजबिले जशी कंपनीतर्फे सक्तीने वसूल केली जातात तसाच वीजपुरवठादेखील वीज वितरण कंपनीमार्फत सुरळीत देणे बंधनकारक आहे. मात्र, वीज वितरण कंपनीतर्फे तसे होताना दिसत नाही. वातावरणात थोडा जरी बदल झाला आणि पाऊस किंवा हवा जोरात असली, तरी कंपनीचे संबंधित विभाग विद्युत पुरवठा खंडित करतात. तसेच वीज वितरण कंपनीचे सलाईनवर असलेले विद्युत प्रवाह करणारे विजेचे खांब व तारांची दुरुस्ती करणे गरजेची असताना दुरुस्ती केली जात नाही. कारण थोडा जरी वादळवारा आल्यास विद्युत पुरवठ्यात बिघाड होऊन तासनतास वीज गुल होते. म्हणून सिडीयम फिडरवर असलेला बिघाड शोधून त्यावर कायमचा बंदोबस्त करून बिघाड दुरुस्त करावा. अन्यथा वीज ग्राहकांना सोबत घेऊन रयत सेना वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ढोल वाजवून झोपलेल्या वीज प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा रयत सेनेच्यावतीने, कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाची प्रत शहर पोलीस निरीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे. निवेदनावर रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, सुनील पवार, दिलीप पवार, किरण पवार आदींच्या सह्या आहेत.
100721\10jal_4_10072021_12.jpg
चाळीसगाव येथे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता शेंडगे यांना निवेदन देताना गणेश पवार, सोबत स्वप्निल गायकवाड, मुकुंद पवार, भरत नवले, सुनिल पवार व अन्य.