मानवाधिकाराचे धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानचा रावेरच्या सुपुत्राने फाडला दहशतवादी बुरखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:12 IST2021-06-26T04:12:14+5:302021-06-26T04:12:14+5:30

रावेर : मानवाधिकाराचे दुसऱ्या देशांना धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा ढोंगी चेहरा जगासमोर उघडा पाडताना पाकिस्तान ...

Raver's son tears down terrorist veil of Pakistan, teaching human rights lessons | मानवाधिकाराचे धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानचा रावेरच्या सुपुत्राने फाडला दहशतवादी बुरखा

मानवाधिकाराचे धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानचा रावेरच्या सुपुत्राने फाडला दहशतवादी बुरखा

रावेर : मानवाधिकाराचे दुसऱ्या देशांना धडे शिकवणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा ढोंगी चेहरा जगासमोर उघडा पाडताना पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा बालेकिल्ला असून, क्रूरकर्मा दहशतवाद्यांना पाकिस्तान धर्माच्या नावाखाली पैसा जमवून, पेन्शन पुरवून व त्यांना राजाश्रय देत असल्याचा घणाघाती हल्ला चढवला. किंबहुना आंतरराष्ट्रीय दहशतवादाला खतपाणी घालून दहशतवादामुळे जाणाऱ्या निष्पाप बळींसाठी पाकिस्तानलाच का जबाबदार धरले जाऊ नये? असा खडा सवाल उपस्थित करून पाकी दहशतवादाच्या बुरख्याची चिरफाड संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार स्थायी मोहिमेचे भारताचे प्रथम सचिव पवनकुमार बढे यांनी केली आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल येथील मूळ रहिवासी तथा महापारेषणचे सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता तुळशीदास बढे यांचे ते सुपुत्र आहेत. जिनेव्हा येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेत ते बोलत होते.

मानवाधिकाराच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानला झोडपून काढत पाकिस्तानच्या अवघड जागेवरचे दुखणे जगासमोर मांडल्याने पाकिस्तानचे पित्त खवळले आहे. इस्लामिक कट्टरपंथी दहशतवादाचा पाकिस्तान बालेकिल्ला असल्याचे वास्तव जगासमोर मांडून पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा त्यांनी फाडला आहे. पाकिस्तानमधील दुसऱ्या जातीधर्मांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पाकी सरकारने ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची गरज असल्याचे बढे यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी त्या सरकारने सुनिश्चित करण्याची गरज आहे. पाकिस्तानमधील दरराेज राजरोसपणे होणाऱ्या धर्मांतरांच्या घटना सहजरीत्या घडत असल्याबाबत बढे यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाजातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर पाशवी अत्याचार व जबरदस्तीने धर्मांतर केले जात असताना मात्र पाकिस्तान सरकारकडून त्याकडे हेतुत: दुर्लक्ष केले जात असल्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. एव्हाना, पाकिस्तान सरकारला अल्पसंख्याक समाजाची सुरक्षा वा मानवाधिकारांशी कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक वा देणे-घेणे नसल्याबाबतच्या उदासीनतेचा बढे यांनी बुरखा फाडला.

पाकिस्तानमधील पत्रकारितेची स्थिती आपल्यासमोर असून, पाकिस्तानला जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्राचे मॉडेल बनण्याचा गौरव पत्रकारितेत प्राप्त झाला आहे. किंबहुना पाकिस्तान सरकारवर टीका-टिप्पणी करणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणे, मारझोड करणे, छळ करणे, हवेत उडवून देणे व चक्क त्यांचा सरकारविरोधी आवाज दडपण्यासाठी हत्या करण्याचे निंदनीय प्रकार केले जात असल्याचीही टीका बढे यांनी करून जगासमोर पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे.

Web Title: Raver's son tears down terrorist veil of Pakistan, teaching human rights lessons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.