हॉटेलच्या सांबारमध्ये उंदीर

By Admin | Updated: May 13, 2014 13:28 IST2014-05-13T00:40:06+5:302014-05-13T13:28:28+5:30

स्टेडियम कॉम्प्लेक्समधील हॉटेल मद्रास कॅफेमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या पत्रकाराच्या मसाला डोशाच्या सांबारमध्ये चक्क उंदीर आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली.

Rats in Hotel Sambar | हॉटेलच्या सांबारमध्ये उंदीर

हॉटेलच्या सांबारमध्ये उंदीर

जळगाव : स्टेडियम कॉम्प्लेक्समधील हॉटेल मद्रास कॅफेमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या पत्रकाराच्या मसाला डोशाच्या सांबारमध्ये चक्क उंदीर आढळून आल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने उंदराचे अवशेष व सांबारचे नमुने तपासणीसाठी घेतले असून परवानाच न आढळून आल्याने हॉटेल पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सहायक आयुक्त बी.यु. पाटील यांनी दिले आहेत. स्टेडियम कॉम्प्लेक्समधील दुकान नं.१४ व १५ मध्ये हॉटेल मद्रास कॅफे असून त्याचे किचन मात्र कॉम्प्लेक्सच्या जिन्याखालील अवघड व अतिक्रमित जागेत आहे. पत्रकार प्रदीप भरतसिंग राजपूत रा.जळगाव हे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भूक लागल्याने या हॉटेलमध्ये आले. त्यांनी मसाला डोसा मागविला. मसाला डोसा, सोबत खोबर्‍याची चटणी, सांबार अशी थाळी त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. मसाला डोसा खात असताना सांबारमध्ये त्यांना काळपट वस्तू दिसली. त्यानंतर सांबारमध्ये उंदीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना मळमळ सुरू झाली. त्यांनी तातडीने आपल्या सहकार्‍यांशी संपर्क साधला. त्यामुळे त्यांचे सहकारी दाखल झाले. तातडीने अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच आरोग्याधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांनीदेखील सुरुवातीला केवळ येतो म्हणून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मनपा आयुक्तांशी संपर्क साधल्यावर आयुक्तांनी आरोग्याधिकारी व अन्न निरीक्षकांना फटकारले. त्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बी.यु. पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली. तर सायंकाळी उशिरा अन्न निरीक्षक विवेक पाटील यांनीही येऊन पाहणी केली. हॉटेल मालक पेठकर हे बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांचे मामा भागवत भंगाळे हे तातडीने दाखल झाले. काही वेळाने स्वत: पेठकरही दाखल झाले. अन्न निरीक्षकांकडून पंचनामा आरोग्य निरीक्षक एस.व्ही. पांडे हे सहकार्‍यांसह दाखल झाले. त्यानंतर तातडीने पंचनामा करण्यात आला. सांबारमधील उंदराचा शिल्लक भाग तसेच सांबारचे चार नमुने घेऊन ते सील केले. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होती. गटारी जैसे थे हॉटेलमधील कचरा समोरील गटारीत सर्रास टाकला जातो. त्यामुळे ही गटार कायम तुंबलेली असते. बाजूलाच उघड्यावर भाज्या चिरण्याचे काम सुरू असते. मनपा आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील यांनी स्वत: या ठिकाणी भेट दिली. तुंबलेल्या गटारी, अस्वच्छतेकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत केवळ तेथील चर्चा ऐकून ते निघून गेले. त्यांना विचारणा केली असता अस्वच्छतेबाबत हॉटेलला नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. नमुने दूषित आढळल्यास शिक्षा हॉटेलमधून जप्त केलेले अन्न पदार्थाचे नमुने दूषित असल्याचे तपासणीत आढळून आल्यास हॉटेल मालकाविरुध्द न्यायालयात खटला चालविला जातो. या खटल्यात ६ महिने कारावास व २५ हजारांपासून जास्तीत जास्त १० लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. तातडीने साफसफाई सांबारमध्ये उंदीर आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी दाखल होताच आतापर्यंत हॉटेलच्या स्वच्छतेकडे कानाडोळा करणार्‍या हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी मालकाच्या सूचनेवरून तातडीने किचनमध्ये साफसफाई सुरू करीत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. तसेच उंदीर आढळलेली प्लेट व सांबारही उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अडविण्यात आल्याने तो प्रयत्न फसला. जिल्हा रुग्णालयात उपचार हा प्रकार उघड झाल्यानंतर राजपूत यांची प्रकृती बिघडली. जिल्हा रुग्णालयात त्यांना अ‍ॅडमिट करून घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संध्याकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडले.

Web Title: Rats in Hotel Sambar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.