At the Rathotsav procession in Bahadurpur | बहादरपूर येथे रथोत्सव जल्लोषात
बहादरपूर येथे रथोत्सव जल्लोषात

ठळक मुद्देबद्रीनारायणाच्या जयघोषाने दुमदुमला बहादरपूर परिसरमोगरी लावण्याचा मान भोई समाजालाआकर्षक फुलांची सजावट

बहादरपूर, ता.पारोळा, जि.जळगाव : प्राचीन जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र बद्रीनारायण मंदिराचा रथोत्सव उत्साहात पार पडला. परंपरेनुसार श्रीरामलाल मिश्रा यांचे वंशज नारायण मिश्रा यांच्या हस्ते बद्रीनारायण महाराजांचे व रथाचे विधिवत पूजन करून दुपारी १२ वाजता बद्रीनारायण भगवान की जय अशा घोषणांनी सुरुवात करण्यात आली. रथाच्या अग्रभागी राग मिश्रा विद्यामंदिरातील लेझीम पथक तसेच गावातील तेली वाडा मित्र मंडळ, नवनाथ मित्र मंडळ, लाल किल्ला मित्र मंडळ, पाटील वाडा मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, भोई वाडा आदी मंडळांनी सहभाग घेतला. रथावर पुढे अर्जुन व हनुमान यांचे पुतळे बसवण्यात आले होते. तसेच रथमार्गावर सुंदर रांगोळी काढून रथ फुलांनी सजवला होता.
आकर्षक फुलांची सजावट
३५ फूट उंच रथाला झेंडूच्या व शेवंतीच्या फुलांनी सजविण्यात आले होते, तर वर कळसावर ऊस व भगवा ध्वज उंचावर तसेच रथाच्या चारही बाजूंना केळीचे खांब बांधण्यात आले होते. गणपत सहादू वाणी यांच्याकडून आकर्षक सजावट करण्यात आली.
मोगरी लावण्याचा मान भोई समाजाला
बहादरपूर गावात भोई समाजाला हा मान मिळतो आणि तो मान भोई समाज रथाला मोगरी लावून रथाला वळण देतात. त्यामध्ये जानकीराम भोई, अण्णा भोई विक्रम भोई, सुनील भोई, भुषण भोई, राम भोई, अनिल लोहार, मधुकर वाणी, मोहन भोई, भाईदास भोई आदी समाजबांधवांचे सहकार्य लाभले.
रथ चौकातून बहादरपुर ग्राम पंचायत मार्गे बाजारपेठ, जेडीसीसीबँक, शिरसोदे ग्रामपंचायत, मोठा पाटील वाडा, मारुती चौक भट्टी चौक, महाजन वाडा, पिंपळ चौकातून श्रीकृष्ण चौक या मार्गाने मिरवणूक निघून रथ सायंकाळी उशिरापर्यंत जागेवर आणण्यात आला.
आज पालखी सोहळा
पारोळा : येथील बद्रीनाथ संस्थानच्या वतीने मंगळवारी पालखी सोहळा व दुपारी ३ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.

Web Title: At the Rathotsav procession in Bahadurpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.