रससिद्ध कवी कुलगुरू कालिदास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:39+5:302021-07-09T04:11:39+5:30
लेखक - प्राचार्य डॉ. विश्वास पाटील कालिदास. ...

रससिद्ध कवी कुलगुरू कालिदास
लेखक - प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
कालिदास. कवी कुलगुरू. थोर नाटककार. सरस्वतीचे लाडके सुपुत्र. कवीचा निश्चित काळ भल्या-भल्यांनाही सांगता येत नाही. महान शिवभक्त. निष्णात राजकवी. श्रुती-स्मृती, इतिहास, पुराण यांचे ज्ञाते. सहा शास्त्रांचे अभ्यासक. वैद्यक, ज्योतिष, अर्थशास्त्राचे पंडित. व्याकरण, संगीत, चित्रकलेत प्रवीण. शृंगार रसाचे परिपोषक. गृहस्थधर्माचे पुरस्कर्ते. मालवा येथील उज्जैन नगरीचे ते रहिवासी. कालिदासांच्या व्यक्तिमत्त्वाची बैठक सौंदर्यसंपन्न शिवसाधनेने भारलेली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची चतु:सूत्री आहे – अपरंपार विद्वत्ता, सौंदर्यासक्त दृष्टिकोन, निसर्गसन्मुख संवेदना आणि भावसमृद्ध चिंतन.
वाल्मीकी आणि व्यासांच्या नावांनंतर कालिदासाचाच विचार करावा लागतो. ते भारतीय समृद्ध परंपरांचे पाईक आहेत. त्यांचे सात ग्रंथ प्रमाण मानले जातात. ऋतुसंहार, मेघदूत, रघुवंश आणि कुमारसंभव या काव्यरचना आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोवर्शीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके. या लेखनातून आपण संस्कृतीचा - भारतीय साधनेचा सारांश वाचू शकतो.
कालिदासाने प्रणयाची चित्रे रंगवलीत. ही सूक्ष्म व तरल आहेत. कामगंधविरहित आहेत. आंतरिक व आत्मीय प्रीतीचा ध्वज कालिदासांच्या काव्याच्या खांद्यावर विहरताना दिसतो. त्याग आणि तपामुळे उजळणाऱ्या शुचिर्भूत प्रेमाला ते मान्यता देतात. नारी जातीविषयी त्यांच्या मनी अपरंपार आदरभाव विलसतो. सीता, पार्वती, शकुंतलेचे चित्रण करताना ते कमालीचे भावसंवेदनघन होतात. तप, तपोवन आणि त्याग या त्रिवेणीवर त्यांच्या नायिका अधिष्ठित आहेत. त्यांनी निसर्गाला एक सजीव पात्र कल्पिले आहे. इथे पार्थिवाचे आध्यात्मिक ऊर्ध्वीकरण आढळते. ईहला परार्थाचा समंत्रक संदर्भ लाभतो. शारीरिक प्रेमभावना विदेही ठरते. देहजन्य भाव-भावनांना स्वर्गीय उत्सवाचे वरदान प्राप्त होते. कवी मातकट संदर्भांना ज्योत्स्नेचे लेपन करतात. धरतीला गगनाची प्रभा अर्पितात.
कालिदास निसर्गवेडे कवी आहेत. ‘ऋतुसंहार’ याचे ठळक उदाहरण सांगता येते. कवी निसर्गाप्रती तटस्थ नाहीहेत. निसर्ग त्यांच्या काव्य प्रतिभेची सजीव संगिनी आहे. ते निसर्गात नारी बघतात व नारीच्या ठायी निसर्गाची झळाळी अनुभवतात. मानवी जीवनाची परिपूर्णत: निसर्गाच्या सान्निध्यात फुलते-विलसते. निसर्गाशी आत्मीय अनुसंधान साधता आले तर माणूस अमृततत्त्वाला निमंत्रण देऊ शकतो. आपल्या लोभासाठी डोळे मिटून वाटचाल करू लागला तर विनाशाच्या खाईत कोसळतो.
कालिदासांना निसर्ग तपाचरणाची तापस भूमी वाटतो. सुसंस्कृत चित्तवृत्तीचे उपमान म्हणजे निसर्ग. त्यांच्या लेखणीने परोपरीने निसर्गाच्या या लोभस रूपाचे चित्रण केले आहे. सर्वत्र निसर्गाचे सुंदर, संयत आणि मनोहारी दर्शन घडते. कालिदासांची नर्मदा उत्फुल्ल. गर्जना करीत धरेवर उतरणारी कुमारिका. आम्रकुटाच्या अंगांगांवरून मोत्यांच्या घरंगळणाऱ्या माळांसारखी ही जलधारा. धरेला आपल्या बळकट बाहुपाशात आबद्ध करणारी ही जलसंपदा. ही गजराजाच्या देहावरची थरथरती झूल. जांभूळगंधाने भारलेली ही पयस्विनी. या प्रवाहाला लाभलाय घंटानादांचा सुमधुर निनाद. यात वन्यगंधांची रमणीय साद. आणि ती विंध्यारण्यातील वेत्रवती. तिचा अदम्य प्रवाह. खडकांच्या छाताडावर प्रचंड आघात करणारा तो विलक्षण वेगवान प्रवाह. तिच्या वक्षावर तरंगत्या विलाशकाय लाटा. प्रचंड जोश आणि उत्ताल वेगाने उचंबळून वाहती ही जलराशी.
ही चिरविरहिणी प्रिया. अरण्य फळांच्या कोषागारातून वाट शोधत अग्रेसर होत जाणारी ही घनव्याकुळ भामिनी. आणि ही गंभिरा. शाल लपेटून प्रवासाला निघालेली जणू तन्वंगी. हिच्या काठावर सजलेला सुरम्य रंगोत्सव. हिच्या आवर्तमयी स्वरलहरीमधून प्रकटणारी निसर्गाच्या पदन्यासांची रुणुक-झुणुक. हिच्या काठावर सजून असलेल्या अज्ञात व अस्पर्श कथा-वार्ता. या सरिता आज आपण हरवून बसलो आहोत. या केवळ कवितेच्या पानांवर सजून आहेत. भूगोलाच्या नकाशांवर वाचता येणार आहेत. कोमेजलेल्या प्रसून समूहांसारख्या या सरिता.
योगी अरविंद कालिदासांच्या प्रतिभेला नमन करताना म्हणतात की, कालिदासांची काव्यसृष्टी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचतन्मात्रांनी सुशोभित आहे. इथे भावसंपन्न, बुद्धिगम्य, रसात्मक आदर्शांची गुंफण आहे. इथे नैतिकता रसमय आणि बुद्धी सौदर्यतत्त्वाने अनुशासित आहे.
पाश्चात्त्य विद्वान आणि संशोधक ए. बी. किथ आपल्या ‘संस्कृत साहित्याचा इतिहास’ या ग्रंथात लिहितात की, कालिदास विश्वकवी आहेत. त्यांनी मानवी अंत:करणात प्रसृत मौलिक द्वंद्वांना अभिव्यक्ती दिली आहे. कधी यक्षाच्या विरह साधनेतून ती प्रकट होतात, तर अजविलापातून त्यांना वाट मिळते.
कालिदासांची प्रतिभा अलौकिक आहे, असाधारण आहे. कवीने राष्ट्राच्या समग्र सांस्कृतिक चैतन्याला अभिव्यक्ती दिली आहे. कालिदासांच्या लेखनात धर्म व तत्त्वज्ञानाची सुंदर आखणी आहे. शिल्प व साधनेतील उदात्ताची उजळणी आहे. ललित व मोहनतत्त्वाचा सुमधुर विन्यास आहे. आनंदाची उधळण आणि प्रेरणांचा पुरुषार्थ आहे. सुकुमारतेसोबत सुशीलतेचा आग्रह आहे. मानसिक मृदुतेसोबत चारित्रिक दृढतेचा विचार आहे. अपार वैभवासोबत रणरणती वैराग्यधून आहे. दुर्मीळ गुणसंपदेचा असा अलौकिक मणिकांचनयोग आहे.