जळगावात आढळला दुर्मीळ भारतीय अंडीखाऊ सर्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:25+5:302021-08-23T04:19:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सहसा दृष्टीस न पडणारा वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी ...

जळगावात आढळला दुर्मीळ भारतीय अंडीखाऊ सर्प
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सहसा दृष्टीस न पडणारा वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी असा दुर्मीळ भारतीय अंडीखाऊ सर्प (इंडियन एग इटर) हा जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरात शुक्रवारी आढळून आला. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या सापाला नागरी रहिवासात सुरक्षित रेस्क्यू करून मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या निगराणीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आला.
सत्यम पार्क परिसरातील एका नागरिकाने वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना दूरध्वनी करून, आपल्या घरात साप असल्याची माहिती दिली. सोनवणे यांनी तत्काळ सत्यम पार्कला धाव घेतली. दरम्यान, अंगणातील कडीपत्त्याच्या झाडावर जाऊन बसलेल्या या सापाचा शोध घेत त्याचे निरीक्षण केले असता तो भारतीय अंडीखाऊ सर्प असल्याचे जाणवले.
दहा वर्षांत २२ सापांची नोंद
वन्यजीव संरक्षण संस्थेने गेल्या दहा वर्षांत २१ भारतीय अंडीखाऊ सर्प वाचवून सुरक्षित अधिवासात सोडले आहेत. ही २२वी नोंद ठरली. पूर्वी शहराचा विस्तार आजच्याइतका नसल्याने झाडोरा, मोकळी मैदाने खूप होती, शेतीशिवार मुबलक होते. बांधावरील लहानमोठ्या झाडांवर बुलबुल, मुनिया, सुगरण, नर्तक, चिमणी, सुभग, होला यासारखे पक्षी घरटी करून राहत असत. त्यांची अंडी खाऊन हा सर्प आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे. आता शेतात रासायनिक फवारणी होत असल्याने या पक्ष्यांनी शेतांकडे पाठ फिरवली असून, त्याचबरोबर शेताचे बांध पेटविले जात असल्याने भारतीय अंडीखाऊ सर्पाच्या अधिवासाला धोका पोहोचत असल्याचे मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी सांगितले.