अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावास; कोर्टाचा निर्णय
By सुनील पाटील | Updated: November 9, 2022 18:13 IST2022-11-09T18:13:18+5:302022-11-09T18:13:45+5:30
विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावास; कोर्टाचा निर्णय
जळगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तीन महिने अत्याचार करणाऱ्या लखन उर्फ विजय रमेश गायकवाड (वय २४,रा.भडगाव) याला न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावास व ४३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी बुधवारी हा निकाल दिला.
लखन गायकवाड याने २५ मे २०१८ रोजी पीडितेला फूस लावून पळवून नेत तीन महिने अत्याचार केले होते. या प्रकरणात अतुल उर्फ योगेश राजू गायकवाड याने मदत केली होती. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन भडगाव पोलिसात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे यांनी या तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.जिल्हा सत्र तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात हा खटला चालला. विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी करुन ११ साक्षीदार तपासले. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्वाची ठरली. ॲड. बोरसे यांचा प्रभावी युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेले पुरावे पाहून लखन याला सहा कलमांमध्ये दोषी धरण्यात आले तर अतुल याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.