केळी पिकविम्याचा निकषावरून रंगला श्रेयवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:13 IST2021-06-21T04:13:21+5:302021-06-21T04:13:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - गेल्यावर्षी हवामान आधारित फळपिक विम्याचा निकषात बदल केल्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नाराज ...

केळी पिकविम्याचा निकषावरून रंगला श्रेयवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - गेल्यावर्षी हवामान आधारित फळपिक विम्याचा निकषात बदल केल्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नाराज होते. त्यानंतर शेतकऱ्यांचा मागणीनंतर अखेर केळी पिक विम्याच्या त्या जाचक निकषांमध्ये बदल करण्यात आला असून, पुर्वीप्रमाणेच जुनेच निकष कायम राहणार असल्याने केळी उत्पादक शेतकरी आनंदित आहेत. मात्र, दुसरीकडे बदललेल्या या निकषांवरून आता पालकमंत्री गुलाबराव पाटील व खासदार रक्षा खडसे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. दोन्ही नेत्यांकडून बदललेले निकष आमच्या प्रयत्नांनी झाले असल्याचे सांगितले जात आहे.
केळी पीक विम्याचे निकष राज्य सरकारने पूर्वीप्रमाणे कायम ठेवले आहेत. कालच यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेना व भाजपत श्रेयवाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरून भाजप खासदार रक्षा खडसेंवर टीकास्त्र डागले. दरम्यान, हे बदल राज्य शासनाने केले की केंद्र शासनाने यावर वादाचा मुद्दा असला तरी यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, गेल्यावर्षी केलेल्या निकषांमुळे यावर्षी त्या जाचक नियमंच्याच आधारावर नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असल्याने यावर्षी केवळ २३ हजार शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, आता पुढील वर्षासाठी पुन्हा जुने निकष कायम झाले असल्याने आता पुढील वर्षासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
रक्षा खडसे यांची ‘चीत भी मेरी और पट भी मेरी’- गुलाबराव पाटलांची टीका
गेल्यावर्षी जाचक निकष लागू झाल्यानंतर भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी पिक विम्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आगपाखड करत राज्य सरकारला काही कळत नसल्याची टीका केली होती. यावर आता पिक विम्याप्रश्नी राज्य सरकारने सगळे केल्यानंतर रक्षा खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हा प्रकार म्हणजे चीत भी मेरी, पट भी मेरी, असाच आहे. वाटायला लागलं इथं लग्न आहे, हे लगेच वाजा घेऊन उभे राहतात', अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट खासदार रक्षा खडसेंवर टीका केली आहे. एकीकडे भाजपचेच खासदार उन्मेष पाटील हे मान्य करत आहेत. तर दुसरीकडे खासदार रक्षा खडसे म्हणतात की हे आम्ही केले. हे श्रेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळाचे आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्याने मिळाले यश - खासदारांचा दावा
याबाबत खासदार रक्षा खडसे यांनी केळी पिकविम्याच्या बदललेल्या निकषांबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे केंद्र शासनाने याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने निकषांमध्ये बदल झाला असल्याचे काही दिवसांपुर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तसेच जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य शासनावर दबाव टाकून आंदोलनाच्या माध्यमामुळे राज्य शासनाला निकष बदलविण्यासाठी भाग पाडल्याचे खडसे यांनी सांगितले होते. तसेच खासदार उन्मेष पाटील यांनी देखील केंद्रिय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व फळ पीक विमा विभागाच्या डायरेक्टर एस. रुक्मिणी यांची भेट घेऊन हे निकष बदलविण्यासाठी पाठपुरावा केल्याचे सांगितले होते.
वर्षभरात नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळणार - शेतकऱ्यांचा प्रश्न
१. केळी पिकविम्याचा निकषात बदल कोणी केला ? यावर श्रेयवाद रंगला असताना गेल्यावर्षी झालेले बदल न होण्याकरीता लोकप्रतिनिधींकडून तेव्हा प्रयत्न केले गेले नाही ? असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जर तेव्हाच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा वेगाने केला असता तर निकषांमध्ये बदल झालाच नसता असे मत चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील केळी उत्पादक शेतकरी अशोक जाधव यांनी सांगितले.
२. आता जुन्या निकषांप्रमाणे पीक विम्याची रक्कम भरूनही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्या जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांना नुकसान होवूनही नुकसान भरपाई मिळणे कठीण राहील याबाबत लोकप्रतिनिधी काहीही बोलायला तयार नाहीत असा संतप्त प्रश्न कठोरा येथील केळी उत्पादक शेतकरी डॉ.सत्वशिल जाधव यांनी उपस्थित केला.
३. यावर्षी कमी, जास्त तापमानामुळे व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र,जुन्या निकषात तापमानाचे निकष जास्त असल्याने शेतकऱ्याचे नुकसान होवूनही त्या निकषात शेतकरी बसूच शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी निकषाबाबतचे श्रेय घेण्यापेक्षा केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून श्रेय घ्यावे असे मत तावसे बु.येथील शेतकरी लक्ष्मण तुळशीराम पाटील यांनी व्यक्त केले आहे.