सहा मुद्यांवर राणेची चौकशी - लैंगिक शोषण प्रकरण
By Admin | Updated: May 14, 2014 00:35 IST2014-05-14T00:35:31+5:302014-05-14T00:35:31+5:30
महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेला येथील संजय गांधी निराधार योजनेचा नायब तहसीलदार ईश्वर राणे याच्या चौकशीसाठी सहा मुद्दे हाताळले जाणार आहेत

सहा मुद्यांवर राणेची चौकशी - लैंगिक शोषण प्रकरण
धुळे : महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याच्या आरोपावरून वादग्रस्त ठरलेला येथील संजय गांधी निराधार योजनेचा नायब तहसीलदार ईश्वर राणे याच्या चौकशीसाठी सहा मुद्दे हाताळले जाणार आहेत. त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा सुसीबेन शहा, सदस्या ज्योत्स्रा विसपुते या २० रोजी येथे दौर्यावर आहेत. योजनेच्या लाभार्थी व गरजू गरीब महिलांकडे नायब तहसीलदार राणे हा शरीरसुखाची मागणी करायचा. त्याशिवाय तो त्या लाभार्थी महिलांचे लाभ देण्यास टाळाटाळ करायचा. शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांना हा गंभीर प्रकार कळाला. त्यांनी स्टिंग आॅपरेशन करत राणेचे महिलांवरील लैंगिक शोषण व अत्याचाराच्या प्रकारांचे पितळ उघडे पाडले. एक वर्षापूर्वी हा प्रकार समाजासमोर आणला गेला. जिल्हाधिकारी कार्यालयात नग्न धिंड काढून राणेला चोप देऊन शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांनी संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी जिल्हाधिकार्यांना नायब तहसीलदार राणेला तडकाफडकी निलंबित करावे लागले होते. यानंतर गायत्री सामाजिक संस्थेने याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी होण्याची मागणी महिला आयोगाकडे केली होती. ती मान्य करत आयोगाने तशी सूचना दिली. तथापि, सीआयडीमार्फत चौकशी झाल्याचे धुळेकरांना ऐकिवात नाही. त्यामुळे महिला आयोगाच्या सदस्यांनी चौकशी करावी, अशी मागणी या संस्थेने केली. त्यानुसार आयोगाच्या अध्यक्षा शाह, सदस्या विसपुते या २० रोजी दौर्यावर आहेत. त्या सहा मुद्यांच्या आधारे राणेप्रकरणी चौकशी करतील. चौकशीतील मुद्दे : राणेच्या काळातील योजनेची पात्र व अपात्र लाभार्थी यादी, राणेचे सेवापुस्तक, राणेविरुद्ध लैंगिक छळणुकीसंबंधी प्राप्त तक्रारी, राणेविरुद्ध खातेअंतर्गत करण्यात आलेली कार्यवाही, जिल्हाधिकारी कार्यालयातील महिलांचा कामाच्या ठिकाणी होणार्या लैंगिक छळास प्रतिबंधक कायद्यांतर्गत गठित समितीचा आदेश व करण्यात आलेली चौकशी, पोलिसांमार्फत झालेली कार्यवाही.