राम जन्मला ग सखे राम जन्मला..
By Admin | Updated: April 4, 2017 17:16 IST2017-04-04T17:16:51+5:302017-04-04T17:16:51+5:30
राम जन्मला गं सखी राम जन्मला’ म्हणत रामजन्माचा दिव्यसोहळा सुवर्णनगरी अर्थात जळगावात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
राम जन्मला ग सखे राम जन्मला..
जळगाव,दि.4- चैत्र शुध्द नवमीचा मंगल दिवस.शहरातील श्रीराम मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी . नामजपाला भरते आलेले.. शुभघटिका समीप येत चाललेली.. उत्कंठा शिगेला पोहचलेली.. अन् दोन प्रहरी ‘सियावर रामचंद्र की जय’चा एकच जयघोष झाला.. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ म्हणत रामजन्माचा दिव्यसोहळा सुवर्णनगरी अर्थात जळगावात मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. मंदिरांमधून टाळ-मृदुंगाचे मंगल सूर ऐकू येत होते. जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिर व नविन बसस्थानक परिसरातील चिमुकले राममंदिरासह इतर मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच अनेक युवकांनी आपल्या दुचाकींवर भगवे ध्वज लावल्याचे चित्र शहरात मंगळवारी पहायला मिळाले.
चिमुकले राम मंदिरात राम नामाचा गजर
नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त पहाटे 5.30 वाजता महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी हभप दादा महाराज यांचे रामजन्मावर कीर्तन झाले. मंदिरात सोमवारी दुपारी 12 वाजेपासून रामनामाचा जप अखंडपणे चालूच होता.
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव मोठय़ा भक्तीभावात साजरा करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश भोळे, नगरसेविका सीमा भोळे आदींनीदेखील श्रीरामाचे दर्शन घेतले. जन्मसोहळ्यानंतर पाळण्यातील राम मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती.