पावसाने दिलासा, मात्र रस्त्यांनी केले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST2021-08-20T04:21:57+5:302021-08-20T04:21:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे ...

The rains brought relief, but the roads were haunting | पावसाने दिलासा, मात्र रस्त्यांनी केले हवालदिल

पावसाने दिलासा, मात्र रस्त्यांनी केले हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे शेतकरी व उकाड्याने हैराण जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा अपयशामुळे खराब रस्त्यांमुळे जळगावकर हवालदिल झाले आहेत. चिखल, खड्डे आणि पाण्याचे डबके तुडवून जळगावकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. पावसानंतर आता शहराच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे एक जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात विशेष करून गेल्या तीन वर्षांपासून तर नेहमी हवाहवासा वाटणारा पावसाळा खराब रस्त्यांमुळे जळगावकरांना नकोसा वाटू लागला आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीनतेमुळेच ही वेळ आली आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची समस्या निर्माण होत असताना देखील मनपाकडून साधी दुरुस्तीही केली जात नाही.

शहरातील एकूण रस्त्यांची लांबी - ६४५ किमी दुर्दशा झालेल्या रस्त्यांची लांबी - ५७० किमी शहरातील ७५ % रस्त्यांची लागली वाट

आता अमृतच्या नावावर खापर फोडणे बंद करा

गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे खराब रस्त्यांचा समस्येला शहरातील लोकप्रतिनिधींकडून नेहमी अमृतच्या कामांनाच जबाबदार धरण्यात येत होते. मात्र, आता अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर भुयारी गटार योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा दुरावस्थेला ‘अमृत’वर खापर फोडण्याचे दिवस ही गेले असून, आता जळगावकरांना चांगले रस्ते द्यावेत, अशीच भावना सर्वसामान्य जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

मुरूम,माती टाकलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

गेल्या महिन्यात पाऊस झाल्यानंतर रस्त्यांची समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर मनपाकडून दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, दुरुस्ती करताना अनेक ठिकाणी माती व मुरुमाचा वापर करण्यात आला. ज्याठिकाणी मातीचा वापर करण्यात आला. त्याठिकाणी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मनपाची दुरुस्ती जळगावकरांना चांगलीच महागात पडली आहे.

दुरुस्तीवर केलेला कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?

महापालिकेने पावसाळ्याआधी ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन केले होते. त्यापैकी मनपाने दिलेल्या माहितीनुसार ४ कोटी रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला कोट्यवधींचा निधी गेला तरी कोठे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

जळगावकरांनी निवडून दिलेले नेते काय म्हणतात...

रस्त्यांची कामे केव्हा होणार?

१०० कोटींचा प्रश्न मार्गी लागल्यावर..

१०० कोटी रुपयांचा निधीमधून रस्त्यांचा कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाकडे याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, राज्य शासनाने स्थगिती उठविली की लवकरात लवकर शहरातील नवीन रस्त्यांचा कामांना सुरुवात करण्यात येईल. - जयश्री महाजन, महापौर

पावसाळ्यानंतर..

शहरातील रस्त्यांचा कामांना अमृत योजनेमुळे ब्रेक लागला होता. आता अमृतची कामे होत आली आहेत. राज्य शासनाकडे स्थगिती असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठली की कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व पक्षीय मिळून प्रयत्न करू. -सुरेश भोळे, आमदार

Web Title: The rains brought relief, but the roads were haunting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.