यावल तालुक्यात पावसाने हाहाकार

By Admin | Updated: July 29, 2014 13:39 IST2014-07-29T13:39:04+5:302014-07-29T13:39:04+5:30

सोमवारीपहाटे सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने यावल तालुक्याच्या पश्‍चिम भागात हाहाकार उडाला.

Rainfall in Jawal taluka | यावल तालुक्यात पावसाने हाहाकार

यावल तालुक्यात पावसाने हाहाकार

पुरात महिलेचा मृत्यू : हतनूरचे सर्व दरवाजे उघडले, तापी पुन्हा कोपली

 
भुसावळ : सोमवारीपहाटे सलग तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने यावल तालुक्याच्या पश्‍चिम भागात हाहाकार उडाला. तालुक्यातील दगडी येथील जयवंताबाई मोतीराम मोरे (वय ६५) ही महिला नैसर्गिक विधीसाठी गेली असता भोनक नदीला अचानक आलेल्या पुरात वाहून गेली. सकाळी तिचा मृतदेह आढळून आला.  या पावसाचा साकळी, किनगाव व चुंचाळे परिसराला मोठा फटका बसला आहे.
चुंचाळे येथे तर अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. प्लॉट भागातील सुमारे ४0 घरांच्या भिंती व पत्रे पडून नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मुख्य रस्त्यावर आठ फुटापर्यंत पाणी साचले होते. पशुधनही वाहून गेल्याची भीती आहे. 
भुसावळ येथे तापीची पातळी १७८.२00 मीटर आहे. तर १८४.१00 मीटरवर धोक्याची पातळी आहे. साकळी येथे १३९.६ किनगाव येथे तीन तासात १३१.५ मी.मी व यावल येथे ५२.४ मी.मी. पावसाची नोंद झाली. किनगाव येथे रात्री ११ ते १२ च्या दरम्यान लेंडी नाल्याला पूर आला. पुराचे पाणी नदी काठावरील घरे आणि दुकानात शिरले. सुमारे ८४ व्यावसायिकांचे नुकसान झाले. घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. (लोकमत ब्युरो)
 
ऐनपूर, निंबोलला वेढा
मध्य प्रदेश आणि विदर्भात पाऊस झाल्यामुळे तापी नदीला मोठा पूर आला. हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले. धरणातून ५ हजार ९८१ क्युसेस इतक्या पाण्याचा प्रती सेकंद विसर्ग होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात तापीने दुसर्‍यांदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. बर्‍हाणपूर येथे नदीची धोक्याची पातळी २२0.८00 मीटर आहे. आज दुपारी ४ वाजता नदी २२९.७00 मीटरवरुन वाहत होती. या ठिकाणी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा ८.९00 मीटरवरून वाहत आहे.नदी काठावरील कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. अतिवृष्टीचा इशारा
येत्या २४ तासात जिल्ह्यात अतवृष्टी होईल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात २६१.१६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तापी नदीला आलेल्या पुरामुळे तसेच हतनूरचे बॅकवॉटर रावेर तालुक्यातील ऐनपूर, निंबोल व विटवे या गावात शिरले. या गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. 

Web Title: Rainfall in Jawal taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.