मराठीच्या पेपरला पडला कॉप्यांचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 00:20 IST2017-03-08T00:20:31+5:302017-03-08T00:20:31+5:30
बंदोबस्त नावालाच : किन्ही हायस्कूलसह डी़एस़हायस्कूलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणात परीक्षा

मराठीच्या पेपरला पडला कॉप्यांचा पाऊस
भुसावळ : दहावी परीक्षेला मंगळवारपासून कडक पोलीस बंदोबस्तात शहरातील आठ केंद्रांवर प्रारंभ झाला असला तरी जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला़ बंदोबस्तावरील यंत्रणेने बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला़
दरम्यान, तालुक्यातील किन्ही येथील सर्वोदय हायस्कूलसह शहरातील डी़ एस़ हायस्कूलमध्ये तीनही तास व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले तर बैठे पथक थांबून आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली़
विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली कॉपी
दहावी परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ झाला़ पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर असला तरी शहरातील बहुतांश केंद्रांवर विद्यार्थ्यांची सर्रास कॉपी सुरू होती तर कॉपी पुरवण्यासाठी थेट दुसरा व तिसरा मजलादेखील गाठण्यात आला़ शहरातील जामनेर रोडवरील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये तर कॉपी पुरवणाºयांची यात्राच भरली होती़ संरक्षण कुंपणाची भिंत ओलांडून थेट विद्यार्थ्यांच्या बाकापर्यंत कॉपी पोहोचली. विशेष बंदोबस्तावर पोलीस व होमगार्ड यंत्रणा असले तरी त्यांनीदेखील कॉपीला एकप्रकारे मूक प्रोत्साहन दिल्याने आश्चर्य व संताप व्यक्त करण्यात आला़
दरम्यान, यावल रोडवरील डी़एस़हायस्कूलमध्येदेखील विद्यार्थ्यांनी वाचनालयाच्या छतावरील थेट दुसºया मजल्यावरील विद्यार्थ्यापर्यंत कॉपी पुरवल्याचे चित्र दिसून आले़
दहावी परीक्षेला शहरातील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी दांडी मारली़ चारही माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे़ मराठीसाठी दोन हजार ७२८ पैकी दोन हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर २४ विद्यार्थी गैरहजर राहिले़ हिंदीसाठी २८४ पैकी २८३ विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला तर एक विद्यार्थी अनुपस्थित राहिला़ उर्दूसाठी ५४७ पैकी ५४४ विद्यार्थी उपस्थित होते तर तीन विद्यार्थ्यांनी दांडी मारली तसेच सिंधी विषयासाठी ६० पैकी केवळ ५८ विद्यार्थी उपस्थित राहिले व दोन विद्यार्थ्यांनी दांडी मारली़