चोरवाटांनी गाडी पकडणाऱ्यांवरही रेल्वे पोलिसांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST2021-04-15T04:15:01+5:302021-04-15T04:15:01+5:30
जळगाव रेल्वे स्टेशन : तिकीट कन्फर्म असल्यावरच दिला जातोय स्टेशनावर प्रवेश जळगाव : तिकीट कन्फर्म नसतांनाही अनेक प्रवासी चोरवाटांनी ...

चोरवाटांनी गाडी पकडणाऱ्यांवरही रेल्वे पोलिसांची नजर
जळगाव रेल्वे स्टेशन : तिकीट कन्फर्म असल्यावरच दिला जातोय स्टेशनावर प्रवेश
जळगाव : तिकीट कन्फर्म नसतांनाही अनेक प्रवासी चोरवाटांनी स्थानकात प्रवेश करून गाडीत बसत असल्याचे प्रकार घडत असल्यामुळे, रेल्वे पोलिसांनी आता चोरवाटांवरही नजर ठेवली असून, अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच स्थानकात सोडण्यात येत आहे.
कोरोना काळात सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना रेल्वे प्रशासनाने तिकीट आरक्षण सक्तीचे केले आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षण असेल, अशा प्रवाशांनाच स्थानकात सोडण्यात येते. आरक्षित तिकीट नसणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म नाही, असे प्रवासी चोरवाटांनी स्थानकात जाऊन गाडी पकडत असतात. तसेच चोरवाटांनी प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची कुठलीही तपासणी होत नाही. त्यामुळे हा प्रकार टाळण्यासाठी ज्या ठिकाणी चोरवाटा आहेत, त्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बलातर्फे रेल्वे पोलीस नियुक्त केले आहेत. हे रेल्वे पोलीस चोरवाटांनी स्टेशनकडे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाकडे तिकिटाची चौकशी करत आहेत. तरच स्थानकावर जाण्यास परवानगी देत आहेत. ज्या प्रवाशाचे तिकीट कन्फर्म नाही, त्यांना माघारी पाठवले जात आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.
इन्फो
...तर होणार कारवाई
सध्याच्या कोरोना काळात सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना तिकीट आरक्षण असल्यावरच प्रवासाची परवानगी आहे. मात्र, असे असतांना प्रवासी चोरवाटांनी स्थानकात येत असल्याने, चोरवाटांच्या ठिकाणी आम्ही रेल्वे पोलीस नियुक्त केले आहेत. आरक्षण नसतानाही जे प्रवासी स्थानकात प्रवेश करतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चयनसिंग पटेल यांनी सांगितले.