जिल्ह्यातील आठ सावकारांच्या घरावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:22 IST2021-08-18T04:22:31+5:302021-08-18T04:22:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अवैध सावकारी प्रकरणात जळगाव जिल्ह्यात झालेल्या चार तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एकाच ...

Raid on the houses of eight moneylenders in the district | जिल्ह्यातील आठ सावकारांच्या घरावर छापा

जिल्ह्यातील आठ सावकारांच्या घरावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : अवैध सावकारी प्रकरणात जळगाव जिल्ह्यात झालेल्या चार तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एकाच दिवशी ४० कर्मचा-यांच्या सहकार्याने रावेर, भुसावळ, यावल तालुक्यात ८ ठिकाणी छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. पोलिस दलाच्या सहकार्यानेही ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील सावदा, कुंभारखेडा आणि तासखेडा (ता.रावेर), आचेगाव (ता.भुसावळ) तसेच यावल येथील अवैध सावकारी करणा-या व्यक्तींविरूध्द जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे ४ तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने अवैध सावकारीविरूध्द कारवाई करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ८ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये ४० कर्मचा-यांचा समावेश होता. आठ पथकांनी नंदकुमार पाटील, सुधाकर पाटील, सुदाम राणे, मधुकर राणे (रा.सावदा), मुरलीधर भोळे (रा.यावल) व मुरलीधर राणे (रा. कुंभारखेडा, ता.रावेर), श्रीधर पाटील (रा.आचेगाव, ता. भुसावळ) या सावकारांच्या घरी मंगळवारी एकाचवेळी छापा मारला.

घरांच्या झडतीनंतर कागदपत्र जप्त

आठ पथकांनी सावकारांच्या घरी छापा मारल्यानंतर घराची झडती घेतली. संपूर्ण कार्यवाहीत पथकांनी २३ खरेदीखत, १ साठेखत आणि १०० रूपयांच्या स्टॅम्पवरील १ सौदा पावत्या अशा प्रकारचे कागदपत्र जप्त केले आहे. पथकांकडून दुपारी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दरम्यान, कारवाईनंतर प्राप्त झालेल्या कागदपत्रांची छाननी व पाहणी करून या प्रकरणात पुढील कारवाई करण्यात येणार आहे. पथकासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

असे होते आठ पथक

चोपडा सहाय्यक निबंधक संजय गायकवाड, अमळनेर सहाय्यक निबंधक किशोर पाटील, जळगाव सहाय्यक निबंधक विजयसिंह गवळी, मंगेशकुमार शहा, पाचोरा सहाय्यक निबंधक नामदेव सुर्यवंशी, एरंडोल सहाय्यक निबंधक गुलाब पाटील, जामनेर सहाय्यक निबंधक जगदिश बारी, चाळीसगाव सहाय्यक निबंधक प्रदीप बागुल या आठ अधिका-यांच्या पथकांनी छापा टाकून कारवाई केली आहे.

Web Title: Raid on the houses of eight moneylenders in the district