चाळीसगावला रब्बीचा पेरा अवघा ३४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 09:55 PM2019-12-09T21:55:03+5:302019-12-09T21:55:10+5:30

कांदा लागवडीवरही परिणाम : गहू, हरभरा आणि मका लागवडीचे क्षेत्र वाढणार, अवकाळीचा फटका

Rabbi sowing at Chalisgaon is 5% | चाळीसगावला रब्बीचा पेरा अवघा ३४ टक्के

चाळीसगावला रब्बीचा पेरा अवघा ३४ टक्के

Next


चाळीसगाव : यंदा झालेल्या अवकाळी पावसाचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले असून रब्बी हंगाम देखील २१ दिवस लांबला आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस तालुक्यात एकूण उद्दिष्टापैकी अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर रब्बीची लागवड झाल्याचे वास्तव समोर आले आहे. रब्बी हंगाम ३१ डिसेंबरपर्यत लांबणार असल्याचे शेतकरी वगार्तून सांगितले जात आहे.
अवेळी झालेल्या पावसाने कांदा लागवडीचेही चक्र बिघडवले असल्याने यंदा गहू, हरभरा आणि मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. तालुक्यात पाच हजार १११ हेक्टर क्षेत्रात रब्बीची लागवड होते. आठ डिसेंबरअखेर एक हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाल्याचे तालुका कृषी अधिकारी सी.डी.साठे यांनी सांगितले. यावर्षी अवकाळी माऱ्याने खरीपाची पुरती वाट लागली. निवडणुकीमुळे शेतीशिवाराचे पंचनामेही लांबले. खरीपाचे उत्पन्न बुडाल्याने बळीराजाला रब्बीसाठी उभारी घेता आली नाही. शेतात अजूनही ओल असल्याने यंदा रब्बी हंगामाचे वेळापत्रक चांगलेच कोलमडले आहे. हाती पैसा नसल्याने रब्बीचा पेरा करायचा कसा? या चक्रातही शेतकरी गुरफटले आहे. अवकाळी आपत्तीचे दृष्य परिणाम पुन्हा दिसू लागले आहेत. साधारपणे एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत रब्बी लागवडीची लगबग असते. यावर्षी अवेळी झालेल्या पावसाने हे नियोजन विस्कटून टाकले असून रब्बीची लागवड ३१ डिसेंबरपर्यंत लांबण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे लावडीच्या ५० दिवसांपैकी ३८ दिवसात फक्त ३४ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे.
यंदा परतीच्या पावसानंतर अवेळी पुन्हा पावसाचे कमबॅक झाले. यामुळे शेतीशिवारांमध्ये उभ्या असलेल्या खरीपाच्या पिकाची खिंडीत गाठल्यासारखी स्थिती झाली. उभी पिके अवकाळी माºयाने आडवी झाली. खरीपाचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. ७० टक्क्यांहून अधिक उत्पन्न बाधित झाले. कपाशी, बाजरी, मका आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. ऐन सीझन मध्येच मालाची आवक होत नसल्याने बाजार समितीही ओस पडली होती.
बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला मका पूर्णपणे भिजला. त्याला कोंब फुटले. कपाशीची देखील अशीच दैना झाली.
पाऊस लांबल्याने पुढे रब्बीच्या लागवडीवरही याचा परिणाम झाला. शेतात अद्यापही ओल असल्याने आणि थंडीही वाढल्याने रब्बीच्या लागवडीत व्यत्यय येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत रब्बी लागवडीचे क्षेत्र काहीअंशी वाढणार आहे. गहू, हरभरा आणि मक्याच्या पेºयात वृद्धी होईल.

अवेळी झालेल्या पावसाने उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला. काढणीला आलेल्या कांदा पिकाला पावसाने झोडपून काढल्याने उत्पन्नाला मोठी कात्री लागली. रब्बीत लागवड करावयाची रोपेही पिवळी पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यावर्षी तालुका कृषी विभागाने तीन हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असले तरी आठ डिसेंबरअखेर फक्त ५६० हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली असून महागडी रोपे खरेदी करुन काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे.

Web Title: Rabbi sowing at Chalisgaon is 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.