शिरसोलीत लस घेण्यासाठी भर पावसात लागल्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:43+5:302021-08-22T04:19:43+5:30
शिरसोली : येथे नियमित लस उपलब्ध होत नसल्याने येथील ग्रामस्थांना भर पावसात लस घेण्यासाठी सकाळी ५ वाजतापासूनच प्रतीक्षा ...

शिरसोलीत लस घेण्यासाठी भर पावसात लागल्या रांगा
शिरसोली : येथे नियमित लस उपलब्ध होत नसल्याने येथील ग्रामस्थांना भर पावसात लस घेण्यासाठी सकाळी ५ वाजतापासूनच प्रतीक्षा करावी लागत असून ग्रामपंचायतीने निदान वॉटरप्रुप मंडप तरी लावावा व आरोग्य विभागाने नियमित लस उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
शिरसोली येथे कोविशिल्डची पहिली लस घेऊन काहींना तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊनदेखील दुसरी लस मिळत नसल्याने दुसऱ्या डोससाठी येथील ग्रामस्थांना आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत प्राथमिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयाभोवती सकाळी ५ वाजतापासून तर ९ वाजेपर्यंत कामधंदा सोडून थांबावे लागते. परंतु लस उपलब्ध नसल्याचे ऐकताच माघारी फिरावे लागते. या नित्याच्याच त्रासाने येथील जनता वैतागली आहे. शिरसोलीत नियमित लसच मिळत नसल्याने अनेकांना पहिली लस घेण्यासाठी रुग्णालयाभोवती चकरा माराव्या लागत आहेत. आजपर्यंत बहुतांश ग्रामस्थांनी पहिलाच डोस घेतला नसून दुसरा डोस केव्हा मिळणार म्हणून येथील जनता चिंतित आहे. तरी आरोग्य विभागाने शिरसोलीसारख्या मोठ्या
गावात नियमित लस उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेतून होत आहे.
----------------------
शिरसोली येथील लसीकरण केंद्रावर १५ दिवसांतून एकदाच शंभर-सव्वाशे लस उपलब्ध होत असतात. या लस घेण्यासाठी पहिला, दुसरा, डोस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असतात. परंतु सध्या तरी दुसऱ्याच डोसलाच प्राधान्य दिले जात असले तरी पहिला डोसही उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
----------------------
फोटो कॅप्शन: शिरसोली येथील लसीकरण केंद्रावर भर पावसात सकाळी ५ वाजतापासून थांबून असलेले ग्रामस्थ.